श्रीमंतांची मुलं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतात. त्यातही बड्या उद्योगपतींचं तर काही सांगायलाच नको. जसं राजकरणात, आमदार खासदारांची मुलं आमदार खासदार, हिरोहिरोइनींची मुलं हिरोहिरोईन होणं, हे जवळपास ठरलेलं असतं. तसंच उद्योगपतींची मुलंही उद्योगपतीच होत असतात. पण याला अपवाद आहे ते म्हणजे टाटा उद्योग घराणं. सध्या समुहाच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. रतन टाटा यांनी लग्न केलेलं नाही. त्यांच्या पश्चात सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदाची धुरा मिळाली. पण त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता त्यावरून वाद सुरू आहेत. टाटा समूहावर टाटा नावाची व्यक्ती नसणं, यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण ही चर्चा करण्याआधी या उद्योग समूहाच्या यशस्वी वारसदारांबाबत चर्चा करू यात.

Photo Source : www.reddif.com
टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटांचे मामा दादाभाई टाटा. त्यांचा मुलगा अर्थात जमशेदजींचे मामेभाऊ रतनजी हेदेखील टाटा समूहात भागीदार होते. त्यांना दुसरी फ्रेंच पत्नी सुझानपासून मुलगा झाला तो म्हणजे जहांगीर. जमशेदजींनंतर याच जहांगीर रतनजी दादाभाई टाटा अर्थात जेआरडी टाटांनी उद्योगाला नवी दिशा दिली. म्हणजेच जमशेदजींचा मुलगा नाही तर त्यांच्या मामेभावाचा मुलगा टाटा समूहाचा अध्यक्ष झाला. जेआरडींनी ही जबाबदार मिळवली आणि यशस्वीपणे पेलली ती फक्त आणि फक्त त्यांच्या स्वकर्त्वुत्वामुळे. त्यांच्यानंतर अध्यक्ष झालेले रतन टाटाही तसेच कर्त्वुत्ववान. तेही टाटा घराण्याशी दूरून जोडले गेलेले. मुळात रतन टाटांचे वडील नवल मुंबईतील एका मध्यमर्गीय कुटुंबात जन्मलेले.

Photo source : www.dailypioneer.com
मुंबईतील कापड गिरणीमध्ये मास्टरचं काम करणारे होरमुसजी टाटा असं रतन टाटांच्या खऱ्या आजोबांचं नाव. पण होरमुसजी ऐन चळिशीत गेले आणि त्यांच्या पत्नी रतनबाई यांनी दोन मुलांना घेऊन आपले मूळगाव नवसारी गाठले. मुळात या रतनबाई म्हणजे समूह संस्थापक जमशेदजी टाटांच्या बायकोची भाची. अर्थात हिराबाई डाबू यांची बहीण कावूरबाईंची मुलगी. पण मध्यमवर्गीय नवऱ्याच्या मृत्यूनंतर रतनबाईंचे खूप हाल झाले. एवढ्या मोठ्या घराण्याशी संबंध असतानाही त्यांनी कोणासमोर हात पसरले नाहीत. आणि शेवटी गरीबीतच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
तेव्हा रतन टाटांचे वडील नवल खूप लहान होते. आई वडिलांच्या मृत्यूनंतर रतन टाटांच्या वडिलांना चक्क पारशी अनाथालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी जमशेदजींचा मुलगा रतनजी यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नवाजबाईंनी मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि तोच हा नवल होरमुसजी टाटा. नवल यांनी मुंबईत शिक्षण घेऊन पुढे लंडनमध्ये यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केले. त्यांचाच मुलगा रतन टाटा. उच्च विद्या विभूषित असलेले रतन टाटा यांना जेआरडींनी टाटा समूहाची धुरा सोपवली ती त्यांच्या कर्तृत्वामुळेच. टाटा घराण्यात मुलगा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येत नाही, तर जो कर्तृत्व सिद्ध करतो, त्यालाच सिंहासनावर बसण्याचा मान मिळतो, हे नक्की.