सामाजिक

पर्यावरण संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी #मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली. त्याकामी महाराजांना जसे अनेक निष्ठावान मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि #पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी पर्यावरणीय घटकांचा मराठेशाहीच्या उदय व विकासात उपयोग करून घेतला. त्यांच्या पर्यावरण नीतीमध्ये गडकोट, गनिमी कावा, आरमार उभारणी, #जलव्यवस्थापन, #वनसंपत्ती संवर्धन, दुष्काळ निर्मूलन अशा बाबींविषयी चर्चा करता येते.

मराठेशाहीच्या विस्तारासाठी वापरलेले ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र शिवरायांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करूनच विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो की, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.’ या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा शिवरायांनी आपल्या पर्यावरण नीतीत योग्य वापर करून घेतला.

आजच्या सारखीच दुष्काळी परिस्थिती शिवकाळातही होती. १६३० तसेच १६५० या वर्षी दुष्काळ पडल्याची नोंद आढळते. शिवरायांनी हवामानाचा #लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत #आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास #पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे.’ पाणी बचतीचाही संदेश शिवराय देतात.

‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र’ या तत्त्वाप्रमाणे शिवरायांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नागिरी येथील बंदरात जहाज बांधणीचे कारखाने व गोदामे उभारली. सागरीमार्गे शत्रूच्या घुसखोरीस प्रतिबंध करून किनारपट्टीवरील जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे, #भूगोलाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय हे सर्व करणे शक्य नव्हते.

कोकणातील विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथेही शिवरायांनी दुर्गविज्ञान वापरले यावरून शिवराय किती श्रेष्ठ पर्यावरण तज्ञ होते हे दिसून येते. गडाच्या पश्चिमोत्तर बाजूच्या समुद्राच्या तळात अंदाजे ४०० मीटर लांबीची #तटबंदी मरीन आर्किआलॉजी क्लबने शोधून काढली आहे. या तटबंदीचा वापर गडाच्या संरक्षणासाठी केला गेला. शिवकाळात अनेक जहाजे या बाजूने येताना #रसातळाला गेल्याची नोंद इतिहासात आहे. ही जहाजे कशास धडकून फुटतात याचे त्याकाळी पोर्तुगीज व इंग्रजांना कोडे पडत असे.

शिवरायांनी वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले होते. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली जात होती. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. त्यांनी आपल्या एका आज्ञापत्रात वृक्षतोड थांबविण्याचा संदेश देऊन जगतगुरू संत #तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या वचनाचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्याचे आढळून येते.

उद्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याप्रसंगी आपण स्वराज्य संवर्धनासाठी प्रत्येकी एक झाड लावण्याचा संकल्प करूया…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button