महिला अत्याचार
ब्रेकिंग न्यूज आली.. एकदम खतरनाक..! हादरवून टाकणारी..! काळजाचं पाणी पाणी करणारी..!चला, चला आता निषेध व्यक्त करायची वेळ झाली. सोशल मीडियावर हॅशटॅग करा.. रडके पडके व्हिडीओ बनवा.. तीव्र.. Women’s oppression आणखीन तीव्र…. खूपच तीव्र शब्दात निषेध झाला पाहिजे..! मेणबत्त्या पेटवा..हवं तर मोर्चा काढा..भाडखाऊ बलात्काऱ्यांना फाशी द्या.. जाळून टाका अशा घोषणा द्या..! शासनाचा निषेध करा… न्यायव्यवस्थेचा निषेध करा…जात- धर्म सापडला तर त्याचाही निषेध करा…! निर्भया, असिफा, प्रियंका हम शर्मिनदा है… तेरे कातील जिंदा है असं मनातल्या मनात म्हणत घरचा रस्ता धरा..!
मनात निषेधाचा संताप घेऊन घराकडे पाऊल टाकताना एकदा सहज आजूबाजूला बघा. कॉलेजच्या नाक्यावर महागड्या गाड्या घेऊन, डोळ्याला नाईनटी नाईनचा लुख्खा गॉगल लावून, झिपऱ्या वाढलेल्या, केस रंगवलेल्या, कानात बाळ्या टाकलेल्या पोरांचा घोळका येणाऱ्या जाणाऱ्या पोरींचा नजरेतुन किंवा अश्लील शब्दातून बलात्कार करताना दिसेल. त्यातला कुणी आपल्या ओळखीचाही असू शकतो. अथवा असू शकतो एखाद्या श्रीमंतांच्या घरातला, एखाद्या भाईंच्या गँगमधला, एखादया नगरसेवकाचा नातेवाईक, टोळी करून हिंडणाऱ्या घोळक्यातला ठरकी वा आज निघालेल्या निषेध मोर्चातल्या निषेधकऱ्याच्या कुटूंबातलाच एक उनाड मुलगा..! या घोळक्यासमोरून जाताना मुली जशा खाली माना घालून जातील ना; तशीच तुम्हीही मान खाली घाला आणि निघा पुढे..! वेळ असेल तर थोडा बसस्टँडकडे फेरफटका मारा. बसस्टँड बाहेर लागलेल्या त्या ग्रेडच्या चित्रपटाचे पोम्प्लेट; ज्यावर तोडक्या कपड्यातली नटी चेहऱ्यावर मादक हावभाव करून सगळ्यांकडेच बघताना दिसेल. केवळ भास समजून त्याकडे दुर्लक्ष करत स्टँडवर एखादी बस आली की जरासं निरीक्षण करा.
ब्रेकिंग न्यूज
प्रवाशाच्या घोळक्यात एखादी तरुण मुलगी बसमध्ये चढताना दिसली की उगाच तुम्हीही त्या बसमध्ये चढा. त्या गर्दीत तिला जागा मिळाली आणि मिळाली नाही तरीही बारकाईनं तिच्याकडे लक्ष द्या. कदाचित तुम्ही पाहाल तिला नकोसा स्पर्श करणारे.. बसच्या खडखडाटात तिला धक्का देणारे.. उगाच कसलासा विषय काढुन तिच्याशी सलगी करू पाहणारे मर्द… या सगळ्या गोष्टींचा होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर तुम्हालाही दिसेल पण तरी ती काही बोलणार नाही. तुम्हीही हे सगळं पाहिलं असलं तरी, तुम्ही काही बोलायचं नाही. पुढचा स्टॉप आला की गुपचूप बस मधून उतारायचं..! मनाची खूपच ओढाताण झाली असेल तर सरळ घर गाठायचं. घरात बायको सकाळची ब्रेकिंग न्यूज द्यायला तयारच असेल. तुम्हीही तिच्या स्वरात स्वर मिसळून त्या बलात्कारीत मुलीसाठी हळहळ व्यक्त करा. Women’s oppression हवं तर मोकळ्या मनानं त्या बलात्काऱ्यांना एक दोन शिव्या द्या. बायकोलाही वाटेल ना; आपला नवरा खरा खुरा मर्द आहे म्हणून..! तुम्ही आले म्हणून तुमचे लेकरं येतील जवळ तुमच्या, पण तुम्ही मात्र टीव्ही लावाल. टीव्ही वरही त्याच बातम्या असतील बलात्काराच्या.
काही क्षणासाठी
देशात संतापाची लाट उसळलीय असंच चित्र दिसेल तुम्हाला. सगळ्या न्यूज चॅनलला त्याच बातम्या. जवळच बसलेला तुमचा मुलगा किंवा मुलगी विचारेल “पप्पा, बलात्कार म्हणजे काय हो..?” तुम्ही निशब्द होऊन “गप बस.. काही विचारत जाऊ नकोस..!” असं म्हणून बापपणं दाखवून त्याला गप्प बसवणार. मूड चेंज करायचा म्हणून एखादा चित्रपट लावणार. त्या चित्रपटात सिगारेटचा कश मारणारा हिरो हिरॉईनला पटवण्यासाठी आयुष्य पणाला लावताना दिसेल, मधेच प्रेम जुळल्यानंतरचे रोमँटिक गाणे पाहताना तुम्ही हरवून जाल; आणि विसरून जाल सकाळचा बलात्कार… काही क्षणासाठी…! ब्रेक म्हणून लागतील जाहिराती ज्यात कंडोम वापरण्यासाठी समुद्रावर लोळणारी सनी लिओन दिसेल, तर क्लोजअपनं ब्रश केल्यानंतर मुला मुलीत होणारी जवळीक दिसेल. तर फिट है बॉस म्हणत अक्षय कुमार त्याची अंडरवेयर तेवढ्याच रुबाबात मिरवेल.
तुम्ही तेही डोळे विस्फारून बघाल आणि तुमच्या बरोबरीने तुमचा मुलगाही तिच जाहिरात कौतुकानं बघेल. कदाचीत भानावर येत तुम्ही टीव्ही बंद कराल आणि एकांत शोधायला कुठेतरी शहराबाहेर निवांत ठिकाणी जाल. त्याच एकांतात तुम्ही आठवून पहाल कोपर्डी बलात्कारांतरच्या तुमच्या आजूबाजूच्या काही स्त्री अत्याचाराच्या घटना.
हेच आजचे जळजळीत सत्य
दिल्लीत जेव्हा त्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आणि काहूर माजले तेव्हा त्या विरोधात उमटलेला आवाज एकमुखी नव्हता ते मानावेच लागेल. त्यात एक नाराजीचा सुरही होता. खैरलांजी वा कुठल्या खेड्यात गरीब मुली महिलांवर असाच अत्याचार होतो; तेव्हा हा शहरी, उच्चभ्रू, सुखवस्तू समाज झोपाच काढत असतो ना? ती तक्रार चुक म्हणता येणार नाही. ती वस्तुस्थितीच आहे. पण जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा तरी पिडीत गरीबांच्या न्यायासाठी ते आधीचे नाराज तरी एका सुरात बोलतात काय? आज लक्ष्मण माने प्रकरणात जेव्हा खर्याच गरीब, गरजू पिडीत व दलित महिलांवर अत्याचार झाला आहे, तेव्हा गरीब पिडीतांचे तारणहार तरी एका सुरात बोलू शकले आहेत काय?
भंडारा, खैरलांजी, सोनई (अहमदनगर) या घटनांनंतर उंचरवाने न्यायाच्या मागण्या करणार्यांची आजची भाषा कशी सावध झाली आहे? दुसरीकडे दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारानंतर अहोरात्र होमहवन चालवावे, तसे बोलणारे का गप्प आहेत? अन्याय, अत्याचार वा महिलांचा न्याय याची चाड ही अशी परिस्थिती वा व्यक्ती, वर्गानुसार बदलत असते का? समतेच्या लढाईचे म्होरकेही त्यात तरतमभाव कसे करू लागतात ना? यातल्या महिलांचे जातपात वर्ग बाजूला ठेवून किंवा त्यातील संशयितांच्या सामाजिक प्रतिष्ठा, स्थान विसरून आपण अन्याय वा न्यायाचा विचारही करू शकत नाही; हेच आजचे जळजळीत सत्य आहे.
ज्यात सुरवातीला आठवेल तुम्हाला तुमच्याच ऑफिसात नव्याने लागलेल्या मॅडमची चाळीशीतल्या सिनिअरनं काढलेली छेड, काम सोडून आंबट शौकीन गप्पा मारणारे सहचारी, फेसबुक वॉट्स ऍपवर एकांत शोधून स्त्री बघून “झालं का जेवण” विचारणारे मॅसेज, शाळेत शिकणाऱ्या मुलीचं शिक्षकांने केलेल लैगिक शोषण, विवाहपूर्व गरोदर राहिलेल्या आश्रमशाळेतल्या मुलीची आत्महत्या, लग्न ठरलं म्हणून मुलीवर ऍसिड टाकल्याची घटना, सत्तर वर्षाच्या बेवारस म्हातारीवर झालेला बलात्कार तिचे जीर्ण झालेले नि ओरबडलेले शरीराचे रक्ताळलेले अवयव..! आणखी आठवेल तुम्हाला ती मनोरुग्ण बाई जिच्यावर स्मशान भूमीच्या फाटकाजवळ अत्याचार झाला होता. Women’s oppression दुसरी ती मनोरोगी आठवेल जिच्या घाणेरड्या शरीरावर झालेल्या बलात्कारामुळे झालेले तीन वेळचे गरोदरपण..! आठवेल ती पाचवीत शिकणारी पोरगी जिला तिच्या मामानेच ओरबडली होती. ती चार वर्षाची मुलगीही आठवेल तुम्हाला जिची साठ वर्षाच्या त्या म्हाताऱ्यानं विटंबना केली होती.
काळाच्या पडद्याआड गेलेली अनेक उदाहरणे
अशी एका मागे एक काळाच्या पडद्याआड गेलेली अनेक उदाहरणे आठवतील तुम्हाला..! त्या आठवणीने एक भीती आणि संताप पुन्हा तुमच्या मनात पेटून उठेन. सूर्य मावळतील गेला तरी तुमच्या मनात पेटलेला सूर्य अधिक प्रखर झालेला असेल. तुम्ही त्या अंधाराचा स्वीकार करून तिथेच बसून रहाल. त्याच अंधाराचा फायदा उचलून शहरातले काही पोरं घोळक्या घोळक्यान टप्प्या टप्प्यावर सिगारेटचा धुवा अंधाराच्या कक्षेत सोडताना दिसतील तुम्हाला; तर काही बियरच्या बाटलीला चेस करताना दिसतील. कुणीतरी तोच अंधारलेला कोपरा धरून कुणा पोरीशी लाडीगोडीने सौम्य भाषेत बोलताना दिसेल, तर कुणी मोबाईलवर पॉर्न बघताना हरवलेला भासेल. हे सगळं पाहून तुम्हाला चीड येईल पण तरी तुम्ही अंधारासारखंच गुमनाम होऊन तिथुन निघून जालं. रात्र झाल्यामुळे रस्त्यावर फारसे लोक दिसणार नाहीत. त्यातल्या त्यात महिला व मुली तर अजिबातच नाही. पण तरीही एखादी मुलगी दिसलीच तर तिच्या चेहऱ्याकडे निरखून पहा, तिच्या चेहऱ्यावर दाटलेली भीती तुम्हालाही घोर पाडून जाईल.
बलात्काराचा निषेध करताना
तिच भीती मनात घेऊन एकदा पोलिस स्टेशनमध्ये भेट द्यायला जा. मुलींच्या सुरक्षिततेवर त्यांच्याशी चार शब्द बोला. तेही सांगतील नकळतपणे तुम्हाला आकडेवारी नुसत्या एका महिन्यातल्या विनयभंगाच्या, बलात्काराच्या आणि यौन शोषणाच्या अधिकृत गुन्ह्यांची. चोर, व्यसन, गुन्हेगारी करणाऱ्या शाळकरी पोरांची… तुम्ही हे सगळं ऐकून आवाक व्हाल. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून शहराच्या मध्य चौकाकडे पेटलेल्या मेणबत्त्या पाहून तुम्ही तिकडे जाल. शहरातील अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या लोकाबरोबरच सकाळी कॉलेजच्या बाहेर मुलींना छेडणाऱ्या त्या पोरातली दोन तीन टाळकी हातात मेणबत्त्या घेऊन बलात्काराचा निषेध करताना पाहून तुम्ही प्रचंड अस्वस्थ व्हाल. ती अस्वस्थता घेऊनच तुम्ही घरी जाल. झोपताना दिवसभर घडलेल्या घटना आठवुन पाहताना तुम्ही चिंताक्रांत व्हाल. Women’s oppression
तुम्हाला मुलगी असेल तर कदाचित तुम्ही झोपणारच नाहीत. तिच्या भविष्याच्या काळजीने एक क्षण व्यथित व्हाल. त्यावेळी मात्र रात्री झोपताना फक्त आजवर घडलेल्या प्रत्येक अत्याचाराच्या घटनेतील मुलगी तुमची लेक किंवा बहीण किंवा बायको होती असं एका क्षणासाठी कल्पून पहा..! तुमच्या हातात मेणबत्त्या नाही; तर बलात्काऱ्याना पेटवण्याऐवढी चीड निर्माण होईल..! तुम्ही त्या कॉलेज कट्ट्यावर बसलेल्या दादा भाईशी नडण्याची हिम्मत दाखवाल..! तुम्ही बस मध्ये स्पर्श करणाऱ्या त्या नामर्दाला धडा शिकवाल..! बसस्टँड बाहेर लागणारे पोम्प्लेट तुमच्या हाताने फाडाल. एकांतात पॉर्न पाहणाऱ्या त्या पोराला समजुतीने दोन शब्द सांगाल. टीव्हीवर काय बघायचं हे तुम्हीही ठरवाल. ऑफिसात व अन्य कुठेही स्त्रीचा अवमान करणाऱ्यांची कॉलर पकडण्याची धमक दाखवाल. स्त्रीचा सन्मान करण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्याल. अत्याचारी कितीका मोठा असेना तुम्ही नक्कीच त्याच्याशी भिडाल; यासाठी फक्त कुठल्याही निरागस पीडित मुलीत स्वतःची लेक, बहीण, बायको आणि आई पाहता यायला हवी…!
निषेध करणाऱ्या मेणबत्त्या
हा निषेध करणारा समाज तुला न्याय नाही देऊ शकत… कारण निषेध करणाऱ्या मेणबत्त्या धारक लोकांतच लपलेत अनेक बलात्कारी..! व्हाट्स आप स्टेटस ठेवण्याइतका सोपा नसतो बलात्कार; हिम्मत असेल तर त्या प्रत्येक घुसमटून जगणाऱ्या मुलीच्या पाठीशी उभे राहून दाखवा; जी असते प्रत्येक क्षण भीतीच्या कुपणामध्ये..! हे त्यावेळीच होईल; ज्यावेळी प्रियंका,असिफा ,निर्भया आणि त्यांच्यासारख्या कित्येक जणी आपल्याला आई बहिणी वाटतील. समाजात लपलेल्या अशा बलात्काऱ्यांच्या विरोधात एकदा दंड थोपटून बघा मग कळेल निषेध करायचा का की आणखी काही…! Women’s oppression
नाहीतर कितीही मेनबत्या पेटवल्या तरी एक प्रश्न कायम निरुत्तरीत राहील..