शेती

कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान..

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

कोथिंबीर ही स्वयंपाक घराची जणू नवी नवरीच. प्रत्येक पदार्थाला सजवण्यासाठी आणि त्याचा स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती ठरते.

अगदी सकाळच्या नाष्ट्यामध्ये पोह्याला वापरणे असो किंवा झणझणीत मटणाच्या रस्त्यावर तरंगणारे कोथिंबिरीचे पान असो कोथिंबीर प्रत्येकाच्या ठिकाणी आपली वेगळी छाप सोडत असते.

उन्हाळ्यात तर या कोथिंबीरीला विशेष मागणी वाढते. आपण कोथिंबीर लागवडीतून अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत भरघोस उत्पादन कमवू शकता.

आजच्या या भागामध्ये आपण कोथिंबीर लागवडीची ए टू झेड सर्व माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा…

कोथिंबीर  भारतातील जवळपास सर्वच राज्‍यात लागवड  केली जाते. कोथिंबीरीच्‍या उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पानांमुळे कोथिंबीरीस वर्षभर प्रचंड मागणी असते.

परंतु कोथिंबिर पिकाची लागवड मुख्यतः खरीप व रब्‍बी हंगामामध्ये केली जाते. तसेच उन्‍हाळ हंगामामध्ये कोथिंबीर पिकाचे उत्‍पादन जरी कमी असेल तरी मागणी मात्र प्रचंड असते.

म्हणून कोथिंबीरीच्‍या लागवडीला प्रचंड वाव आहे. कोथिंबीरीचे पीक हे रोजच्‍या आहारामध्ये वापरलले जाणारे महत्‍वाचे पालेभाजी पीक आहे.

कोथिंबीरचे विशिष्‍ठ स्‍वादयुक्‍त पाने भाज्‍यांचा स्‍वाद वाढविण्‍यासाठी वापरतात, मुख्यतः मांसाहारी आणि सोबतच शाकाहारी पदार्थामध्‍ये देखील कोथिंबीरीचा वापर करण्‍यात येतो. कोथिंबीरीच्‍या वड्या तर प्रत्तेकच्याच आवडीच्या आहेत.  

कोथिंबिरीसाठी हवामान आणि जमीन Climate and Soil for Coriander

  1. कोथिंबीर पिकाची लागवड कुठल्याही प्रकारच्‍या हवामानामध्ये करता येते. 
  2. अतिपावसी प्रदेश सोडून महाराष्‍ट्रामधील हवामानामध्ये वर्षभर कोथिंबीर पिकाची लागवड केली जाऊ शकते.
  3. उन्‍हाळयामध्ये तापमान 36 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले तर कोथिंबीर पिकाची वाढ कमी होत असते.
  4. कोथिंबीर पिकाकरिता मध्‍यम आणि कसदार तसेच मध्‍यम खोल जमिन निवडावी. सेंद्रिय खतांनी समृद्ध असणारी जमीन असल्‍यास हलक्‍या अथवा भारी जमिनीमध्ये कोथिंबीरीचे पिक चांगले  येत असते.

कोथिंबिरीच्या सुधारीत जाती Improved Varieties of Coriander 

  1. टी 5365  
  2. व्‍ही 1 
  3. व्‍ही 2  
  4. को-1
  5. डी-92  
  6. जे 214 
  7. के 45 
  8. एनपीजे 16 
  9. नंबर 65  
  10. डी-94 

वरील जाती या कोथिंबीर पिकाच्या स्‍थानिक तसेच सुधारित या प्रकारातील  जाती असून भरघोस उत्पन्न देण्यात पुढे आहेत.

कोथिंबीर लागवडीचा हंगाम Season for coriander plantation

मित्रांनो कोथिंबीर पिकाची लागवड खरीप, रब्‍बी व उन्‍हाळ अश्या तीनही हंगामामध्ये  केली जाते. उन्‍हाळ हंगामामध्ये एप्रिल-मे महिन्‍यामध्ये कोथिंबीर पिकाचे उत्‍पादन घ्‍यावे.

कोथिंबीर लागवड पध्‍दती Coriander plantation methods

  1. कोथिंबीर पिकाच्या लागवडीकरिता शेत उभे आणि आडवे नांगरट करून चांगले भुसभुशीत करावे.
  2. 300×200 सेंटीमिटर आकारात सपाट वाफे बनवून घ्‍यावे.
  3. प्रत्‍येक वाफ्यांमध्ये 8-10 किलो चांगले कुजलेले शेण-खत/कंपोस्ट खत टाकून मिसळून घ्‍यावे.
  4. वाफे सपाट केल्यानंतर बीयाणे समप्रमाणात पडेल या प्रकारे फोकून पेरावे.
  5. बीयाणे खत अथवा मातीच्या साह्याने  झाकून हलकेसे पाणी सोडावे. तणांचा प्रभाव जास्‍त  होत असेल तर सपाट वाफ्यांत 15-20 सेमी अंतरावर खुरप्‍याच्या साहाय्याने उथळ ओळी पाडाव्यात
  6. आणि त्यात बी पेरावे व नंतर मातीच्या साहाय्याने झाकून टाकावे.
  7. उन्‍हाळ हंगामामध्ये पेरणीआधी वाफे चांगले भिजवावेत.
  8. आणि वाफसा अवस्था आल्‍यावर बी पेरावे.
  9. कोथिंबीरीच्‍या लागवडीकरिता प्रतिहेक्‍टरी 60-80 किलो बीयाणे लागते.
  10. पेरणीआधी बियाण्‍यास चांगली उगवण होण्‍याकरिता बीजप्रक्रिया करणे अत्यावश्‍यक आहे.
  11. पेरणीआधी धने फोडावेत व बिया वेग-वेगळया कराव्‍यात याकरिता धने चपलेच्या साह्याने किंवा लाकडी फळी वापरून रगडून बीयाणे वेगळे करावे.
  12. तसेच पेरणी करण्यापूर्वी धन्‍याचे म्हणजे कोथिंबीरचे बीयाणे 12 तास आधी पाण्‍यामध्ये भिजवून उबदार जागेवर ठेवावे.
  13. आणि मगच लागवडीकरिता वापरावे. त्‍यामुळे उगवण 15-20 दिवसाच्या ऐवजी 8-10 दिवसामध्ये होते व कोथिंबीर पिकाच्या उत्‍पादनामध्ये वाढ होते. तसेच काढणी देखील लवकर येण्यास मदत मिळते.

कोथिंबिरीसाठी खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन Fertilizer and irrigation management for coriander

  1. कोथिंबीर पिकाच्‍या जोमदार आणि  चांगल्या वाढीकरिता बीयाणे पेरता वेळी प्रतिहेक्‍टरी 35-40 गाडया चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळून द्यावे.
  2. कोथिंबीर  पिकाला पेरणी वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्र प्रकारातील खत द्यावे. बीयाणे उगवून आल्‍यानंतर 20 ते 25 दिवसांनी प्रतिहेक्‍टरी 40 किलोग्राम एव्हडे नत्र द्यावे. 
  3. तुम्ही कोथिंबीर पिकाचा  खोडवा घेणार  असाल तर कापणी नंतर प्रतिहेक्‍टरी 40 किलो नत्र पुन्हा द्यावे.
  4. कोथिंबीर पिकास नियमित पाणी देणे अत्यावश्‍यक आहे. सुरूवातीच्‍या काळामध्ये बियाण्याची उगवण होण्‍याआधी वाफ्याला पाणी देतेवेळी वाफ्याच्या कडेस वाळलेले गवत, जुने पोते किंवा उसाचे पाचट लावावे.

कोथिंबिरीवरील किड व रोग Pests and diseases on coriander

  1. कोथिंबीर पिकावर फारसे कोणते रोग आणि किडी दिसत नाहीत.
  2. मात्र काही वेळेस मर या रोगाचा प्रार्दूभाव दिसून येतो. सोबतच भुरी हा देखील रोग आढळत असतो.
  3. या रोगाच्‍या नियंत्रणाकरीत लांमसीएस-6 यासारख्‍या भुरी रोगास प्रतिबंधक असणाऱ्या जातीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाण्‍यामध्ये विरघळणारे गंधक फावरणीस वापरावे.

कोथिंबीर पिकाची काढणी, उत्‍पादन व विक्री Harvesting, Production and Marketing of Coriander

  1. पेरणीनंतर दोन महिन्‍यांने कोथिंबीर पिकास फुले यायला सुरुवात होते. म्‍हणूनच तत्पूर्वीच कोथिंबीर हिरवीगार तसेच कोवळी-लुसलुशीत असतानाच कोथिंबीर पिकाची काढणी केली जावी.
  2. साधारणतः 15-20 सेमी उंचीची मात्र फुले येण्‍यापूर्वीची कोथिंबीर हाताच्या साहाय्याने उपटून अथवा विळ्याने कापून काढणी करतात. तदनंतर कोथिंबीर-जुडया बांधून गोणीत किंवा बांबूच्‍या टोपल्‍यांत व्‍यवस्‍थीतरित्या रचाव्यात.
  3. बाजारामध्ये विक्रीकरिता पाठवाव्यात.
  4. पावसाळी आणि हिवाळी या दोन हंगामामध्ये कोथिंबीर पिकाचे प्रतिहेक्‍टरी 10-15 टन इतके उत्‍पादन मिळत असते तर उन्‍हाळ हंगामामध्ये 6-8 टन इतके उत्‍पादन मिळते.

 मित्रांनो, आजचा हा कोथिंबिरीवरील माहितीपर लेख आपल्याला कसा वाटला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

तसेच आपल्या इतरही शेतकरी बंधू-भगिनींना हा लेख नक्कीच पाठवा. जेणेकरून ते देखील यातून प्रेरणा घेऊन उन्हाळी कोथिंबीर ची लागवड करतील. आणि चांगला नफा कमवतील.

धन्यवाद…!

-T. Sidharth

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button