आज भारतात आफ्रिकेतून चित्ते आणले गेले. एक काळ असा होता की भारतातही अक्षरशः हजारोंनी चित्ते उपलब्ध होते. सम्राट अकबराकडे एकाच वेळी एक हजार चित्ते त्याच्या शिकारखाण्यात उपलब्ध असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
भारतातीय चित्ते अतिरिक्त शिकारीमुळे आणि चित्त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे लुप्त झाले. आम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना कोल्हापुरातील चित्त्यांचे काही संदर्भ मिळून आलेत. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये चित्त्याकडून हरणांची शिकार करून घेण्याचा एक खेळ जो प्राचीन काळापासून होता तो पुनर्जीवित केला होता.
खरे तर हा खेळ भारतामध्ये खूप प्रसिद्ध होताच पण भोसले घराण्यामध्ये या खेळाची विशेष आवड होती हे आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांच्या एका दगडी शिल्पामध्ये सुद्धा एक चित्ता त्यांच्याबरोबर आपल्याला दिसून येतो. तसेच शंभूराजांचे पुत्र सातारकर छत्रपती शाहू महाराज यांच्याकडेही चित्ते असल्याची नोंद आहे. करवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सातारकर छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून एक चित्ता मागून घेतल्याचे पत्रही उपलब्ध आहे.
या शिकारीच्या खेळामध्ये प्रशिक्षित चित्त्याकडून गवताळ रानात असणाऱ्या हरणांच्या कळपातून नेमक्या मोठ्या काळवीटाची शिकार करण्याची कला या चित्त्यांना शिकवली जात असे.(या काळविटाला बामण्या म्हणत.) या चित्त्यांना सांभाळण्यासाठी काही व्यक्तींनाही प्रशिक्षित केले गेले होते. या व्यक्तींना चित्तेवान असे म्हणत. हे चित्तेवान निडर आणि चित्ते प्रशिक्षित करण्यामध्ये, त्यांची देखभाल करण्यामध्ये निष्णात होते. शाहू महाराजांनी तयार केलेल्या चित्तेवानांची फळी ही तत्कालीन भारतामध्ये नावाजली गेली होती. शाहू काळामध्ये आणि त्यानंतर शाहूपुत्र राजाराम महाराजांच्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये हा चित्ताहंट खेळ खूपच प्रसिद्ध झाला होता. कोल्हापूर मधल्या चित्त्यांची संख्या मोठी असायची. आमच्याकडे कोल्हापुरातील चित्त्यांचे असे एक छायाचित्र उपलब्ध आहे की त्या एकाच छायाचित्रांमध्ये तब्बल 22 चित्ते दिसून येतात. राजाराम महाराजांच्या काळात ही आफ्रिकेमधून चित्ते मागवल्याचे काही संदर्भही उपलब्ध आहेत.
करवीर छत्रपती घराण्यामध्ये शालिनी नावाचा एक चित्ता खूपच प्रसिद्ध झाला होता. या शालिनीचे छायाचित्र सोबत जोडले आहे. त्याचबरोबर राजाराम महाराज चित्ताहंट साठी तयार केलेल्या ब्रिक स्वतः हाकत आहेत आणि या ब्रिक वर पाठीमागे चित्त्याला चित्तेवाण घेऊन बसलेले आहेत .कोल्हापूर मधल्या चित्तहंट आणि चित्ते आज उपलब्ध नाहीत; पण इतिहासाचा अभ्यास करताना अशा चित्त्यांची शेकडो छायाचित्रे व काही कागदपत्रे आम्हाला उपलब्ध झालेत. त्यातील ही काही छायाचित्रे आपल्या पाहण्यासाठी सोबत दिली आहेत. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट ही की कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी आपले जे चित्रपट तयार केले त्या चित्रपटांमध्ये करवीर छत्रपतींच्या कडील चित्त्यांचाही उपयोग करून घेतला होता. त्याचबरोबर भालजी पेंढारकर यांनीही त्यांच्या चित्रपटांमध्ये करवीर छत्रपतींच्याकडे असणाऱ्या चित्त्यांची उपयोग करून घेतला होता. या चित्रपटांमधून कोल्हापुरातील चित्ते आपल्याला लाईव्ह ही पाहता येतात.