अगरबत्ती व्यवसायबद्दल माहिती
नमस्कार मित्रांनो,
कोरोना कालावधीनंतर प्रत्येक जण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. आज मितीस व्यवसाय हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. इंटरनेटवर आणि youtube वर अनेकविध व्यावसायिक कल्पना बघावयास मिळतात, त्यातील अगरबत्ती व्यवसाय हा एक महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. आजच्या भागामध्ये आपण अगरबत्ती व्यवसायाच्या सर्वच पैलूंचा अभ्यास करणार आहोत…
अगरबत्ती व्यवसाय बद्दल (About Agarabatti business)
मित्रांनो अगदी प्राचीन काळापासूनच भारतीय समाज हा श्रद्धाळू आणि उपासक आहे. आणि उपासना म्हटले की काही गोष्टींना अविभाज्य महत्त्व असते. त्यातीलच गोष्ट म्हणजे अगरबत्ती होय. धर्म कार्यामध्ये अगरबत्तीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. आणि अगरबत्ती उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणाल तर अगदी थोड्याशा गुंतवणुकीवर आपण उत्पन्नाचा चांगला टप्पा गाठू शकतो.
आज अगरबत्ती आणि धूप यास सर्वच समाज स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आपण मोठ्या प्रमाणावर अगरबत्तीची निर्मिती करून होलसेल मध्ये मोठ्या दुकानदारांना विकू शकतात. तसेच आपल्या आसपासच्या परिसरात फेरी मारून देखील रिटेल स्वरूपात विक्री करू शकता.
अगरबत्ती व्यवसाय सुरू करताना (Starting of Agarabatti business)
मित्रांनो अगरबत्तीचा व्यवसाय कुटीर उद्योगांमध्ये मोडतो. म्हणजेच अगदी छोट्याशा जागेत प्रसंगी आपल्या राहत्या घरातही हा उद्योग सुरू करता येऊ शकतो. तसेच यास मनुष्यबळही फारसे लागत नाही. हल्ली ऑटोमॅटिक मशीन आल्याने अगरबत्तीच्या काड्यांवर सुगंधी लेप लावणे अतिशय सोपे झालेले आहे. त्यामुळे अगदीच थोडक्या कालावधीत आणि थोड्या भांडवलावर आपण चांगला नफा कमवू शकता. मात्र आपल्याकडे छोटीशी मशीन घेण्याइतपत देखील पैसे नसतील तर आपण काहीशा पदर मोडीवर कच्चामाला आणून हाताने देखील अगरबत्ती बनवू शकता.
अगरबत्ती बनविण्याच्या मशीन बद्दल माहिती (Information about Agarabatti making machine)
मित्रांनो आजकाल सर्वत्र यांत्रिकीकरण झाल्याने वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सर्वच प्रकारच्या उत्पादकांना यांत्रिकीकरणाची कास धरूनच चालावे लागते. यातून अगरबत्ती व्यवसायही मागे नाही. थोडक्या कालावधीत आणि नगण्य मनुष्यबळाच्या आधारे मोठ्या प्रमाणावर अगरबत्ती बनविण्यासाठी मशीन नेहमीच उपयुक्त ठरते.
अगरबत्ती मशीन ही अगरबत्ती व्यवसायाचा पाया म्हटले तरी हरकत नाही. त्यामुळे पाया भक्कम असेल तर इमारती देखील डौलानेच उभ्या राहणार. त्यामुळे अगरबत्ती मशीन घेताना नेहमी विश्वसनीय उत्पादकाकडूनच खरेदी करावी, जेणेकरून मशीनची सारखी देखभाल दुरुस्ती करण्याची देखील गरज भासणार नाही. तसेच अगरबत्ती मशीन एका ठराविक कालावधीनंतर सर्विसिंग करणे गरजेचे असते. त्यामुळे मशीन खरेदी करताना सदर कंपनीच्या आफ्टर सेल्स सर्विस बद्दल इत्यंभूत माहिती करून घ्यावी. तसेच आपल्या भागात घरी येऊन सर्विस करण्याची सोय आहे किंवा नाही याची माहिती देखील करून घेणे तेवढेच गरजेचे आहे.
अगरबत्ती मशीन दिवसातून साधारणपणे 12 तास चालवली तरी देखील, सुमारे एक क्विंटल कच्च्या मालापासून अगरबत्ती निर्मिती करू शकते. यावरून तुम्हाला दैनंदिन नफ्याचा अंदाज येऊ शकेल. (तयार अगरबत्ती 56 रुपये प्रति किलो आहे)
अगरबत्ती बनवण्याची मशीन साधारणपणे साठ हजार रुपयांपासून एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळतात. यामध्ये आपण आपल्या भांडवलाचा विचार करून आणि आपल्या व्यवसायाचा आवाका लक्षात घेता योग्य मशीनची निवड करावी. या मशीन तुम्ही इंडिया मार्ट सारख्या नामांकित संकेतस्थळावरून खरेदी करू शकता.
अगरबत्ती व्यवसायाच्या कच्च्या मालाबद्दल (About raw material of Agarabatti business)
कच्चामाल हा प्रत्येक व्यवसायाचा श्वास असतो. जोपर्यंत कच्चामाल रुपी श्वासाचा पुरवठा चालू आहे, तोपर्यंत व्यवसाय रुपी शरीर चालत असते. अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या छोट्या छोट्या कांड्या, डिंक पावडर, कोळसा पावडर आणि सुवासिक लेपाची गरज असते. अगरबत्ती मशीन विकणारे डीलर्स बऱ्याचदा कच्च्या मालाची देखील पुरवठा करत असतात. तसेच स्थानिक बाजारात देखील कच्चामाल सहजरीत्या उपलब्ध होतो. मात्र तुम्हाला कच्चामाल मिळवण्यास अडचणी होत असतील तर तुम्ही इंडिया मार्ट, अलिबाबा यांसारख्या नामांकित संकेतस्थळावरून कच्चामाल ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. किंवा तेथून पुरवठादारांशी थेट संपर्क साधून मोठ्या प्रमाणात कच्चामाल उपलब्ध करून घेऊ शकता.
अगरबत्ती व्यवसायाचे मार्केट फार मोठे असल्याने अगरबत्तीचा कच्चा माल सहजरित्या कुठेही उपलब्ध होतो. या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या कांड्या या भारतामध्ये व्हिएतनाम आणि चीन या दोन देशांमधून आयात केल्या जातात. ज्याची किंमत साधारणपणे 120 ते 130 रुपये प्रति किलो इतकी असते.
अगरबत्ती साठी सुवासिक लेप तयार करताना (Making of Scented Agarabatti paste)
मित्रांनो ज्या लोकांना दररोज अगरबत्ती लावण्याची सवय असते, ते लोक बाजारात गेल्यानंतर अगरबत्ती मागताना नेहमी विशिष्ट ब्रँडचेच नाव घेऊन अगरबत्ती मागतात. याचे कारण म्हणजे त्या अगरबत्तीचा ग्राहकांना भावलेला सुवास असतो. आपण देखील आपल्या व्यवसायाची ख्याती सर्व दूर पसरवण्यासाठी उच्च प्रतीच्या सुवासाची अगरबत्ती बनवणे गरजेचे ठरते. यासाठी अगरबत्तीचे मिश्रण अर्थात सुवासिक लेप तयार करताना योग्य काळजी घ्यावी लागते. मिश्रण योग्यरीत्या बनले नाही तर अगरबत्ती संपूर्णतः जळत नाहीत, तसेच सुवास देखील चांगला येत नाही. तसेच अगरबत्ती खराब होण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे चांगल्या प्रशिक्षकाकडून किंवा मशीन विक्रेत्याकडून अगरबत्ती मिश्रण बनविणे शिकून घ्यावे लागते. एकदा आपण त्यात पारंगत झालो की मग मात्र आपण सहजरीत्या हे मिश्रण बनवू शकतो.
चांगले मिश्रण बनवल्यानंतर ते मिश्रण बांबूच्या काड्यांना लावावे लागते. त्यासाठी आपण मशीन अथवा हाताचा देखील वापर करू शकता. मशीनमध्ये अगरबत्ती बनवणे अतिशय सोपे असून यामध्ये फक्त तयार मिश्रण मशीन मध्ये लोड करावे लागते. आणि त्यात बांबूच्या कांड्या टाकाव्या लागतात. दुसऱ्या बाजूने आपोआपच अगरबत्ती तयार होऊन निघतात.
तयार झालेल्या अगरबत्ती व्यवस्थित रित्या वाळवाव्या लागतात. यासाठी तुम्ही उघड्या सूर्यप्रकाशात अगरबत्ती वाळवू शकता. मात्र पावसाळ्यामध्ये अगरबत्ती वाळवणी मोठी जिकरीचे होते. त्यासाठी अवघ्या पस्तीस ते चाळीस हजार रुपयांमध्ये तुम्ही अगरबत्ती वाळविण्याचे ड्रायर मशीन घेऊ शकता.
तयार अगरबत्तीना कच्च्या अगरबत्ती म्हटले जाते. यामध्ये सुगंध मिसळलेला नसतो. बहुतांश उत्पादक केवळ कच्च्या अगरबत्ती तयार करून मोठ्या ब्रँड ला विकतात, हे ब्रँड केवळ त्यात सुगंधी अत्तरे मिसळून पॅकेजिंग करून विकतात. मात्र आपल्याला स्वतःचा ब्रँड विकसित करावयाचा असेल तर,मात्र आपल्याला अत्तर मिसळवण्याची देखील स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल.
मित्रांनो यानंतर तयार अगरबत्ती आपण आकर्षक पॅकेजिंग मध्ये पॅक करून गरजेनुसार मार्केटमध्ये पुरवठा करू शकता. आपण मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असाल तर, होलसेल मध्ये मोठे पॅकेजेस तयार करून विकू शकता. मात्र घरगुती तत्त्वावर किंवा छोट्या प्रमाणावर व्यवसाय असेल तर आपण काही अगरबत्ती होलसेल मध्ये तर काही अगरबत्ती आसपासच्या परिसरात फेरी मारून रिटेल स्वरूपातही विकू शकता. यातून चांगला नफा मिळवता येईल.
मित्रांनो आजची ही अगरबत्ती व्यवसायावरील माहिती आपल्याला कशी वाटली? ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. आणि आपल्याही मनात काही व्यवसायिक कल्पना असतील तर त्याबद्दल आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यावरही माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
धन्यवाद…!