स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे
नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं. तेच ते स्पर्धा परीक्षा, If you fail to plan.., साडेतीन वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे! ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहित झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकार्याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे.
भाषेतील अलंकार त्यात उत्कृष्ट रीतीने वापरलेले आहेत, उदाहरणार्थ अतिशयोक्ती! पण त्या भाषणाचा एक वेगळाच परिणाम अधिकारीवर्ग आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर झाला. त्यानंतर अनेक आभाळहेपले अधिकारी उदयास आले. की जे अभ्यास कसा केला, काय वेगळं केलं; यापेक्षा त्यांनी केलेला तथाकथित संघर्ष, गरीबी, परिस्थिती, उपासमार, ठेचा, ठोकरा, हलवेपणा सॉरी हळवेपणा, देशाची सेवा वगैरे अशा भंपक चावून चोथा झालेल्या गोष्टींवर गप्पा झोडायला लागले आणि पेठेतील तसेच इतर ठिकाणची जंता, हे असेले भाषणं ऐकण्यालाच अभ्यास समजायली लागली.
आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ?
नंतर भाषणांची दुसरी लाट आली ती आयपीएस (पक्षी: आयआरएस) अधिकारी भरत आंधळे यांच्या रूपाने. गावाकडच्या पोरा-पोरींना धंद्याला लावण्यात यांचा मोदींचा (पक्षी: सिंहाचा) वाटा आहे. नावं ठेवणारे लोक्स, गावाकडच्या गप्पा, संघर्ष, एवढे वर्ष अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा; स्पर्धा परीक्षा पास होऊन माझ्यासारखं आभाळ हेपलून फेमस होता येईल, हा भाषणाचा सार होता. ज्यांना एमपीएससीतला ‘एम’ सुद्धा माहित नव्हता, ते सुद्धा हे भाषण पाहायचे आणि गाय-छाप खात इन्स्पायर व्हायचे. आंधळ्येंच्या भाषणानंतर, मग एकाहून एक उपटसुंभ अधिकारी भाषणबाजी करून, वर्षभर सेलिब्रिटी होऊन, गायब झाले. ग्रामीण भागातील काहीतरी काम धंदा करणाऱ्या पोरांना या असल्या भाषणबाजांनी एमपीएससी-यूपीएससीच्या धंद्याला लावलं आणि पोरांनी स्वतःचीच लावून घेतली.
तर प्रश्न असा आहे की, मुळात एवढे लोक्स इकडे येतातच कशाला? एवढ्या कमी जागा असतानासुद्धा? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजात मिळणारा ‘स्टेटस’. एकदा का तुम्ही अधिकारी झाले की, लोकांची जिभ घासून जाते पण ते अधिकार्यांची चाटूगिरी सोडत नाही, पावर मिळते. दुसरं म्हणजे ‘पैसा’ एक तर बर्यापैकी पगार, अलाउन्ससेस आणि वरतून खायला भरपूर पैसे असतातच.
अजून एक गोष्ट अशी की राजकीय पुढाऱ्यांच्या शिक्षण सम्राटगिरीचा परिणाम म्हणुन शहरांच्या कोपरापासून, गावाकडच्या खोपच्यात कॉलेजं निर्माण झाली. त्यामुळे अकारण शिक्षणाचा फुगा तयार झाला. वर्षभर कॉलेज न करता सुद्धा बीए, बीएस्सी, बीकॉम वगैरे करून बेकाम झालेले कार्यकर्ते सुद्धा IIT, AIIMS, NIT आणि इतर चांगल्या महाविद्यालयातील टॉपर पोरांशी स्पर्धा करून आयएस, आयपीएस, डीसी तहसीलदार वगैरे होण्याची स्वप्न पाहतात आणि घरच्यांना आशेला लावून ठेवतात. मग पुण्यातल्या पेठेतील चहाच्या दुकानावर गप्पा करण्यात किती वर्ष निघून जातात, याचे काही मोजमाप राहात नाही. रोजचं पेपर वाचन, करंट अफेयर्स मुळे; राजकारणही वाचण्यात येतं. मग हे राजकीयतज्ञ पार राजकारण्यांचे आई-बाप एक करतात. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेला C-Sat क्वालिफाय न ठेवल्यामुळे जेवढे अभ्यासू पोरं नापास झाले नसतील, तेवढे पवार साहेबांच्या राजकीय डावपेचांच्या गप्पा करण्याने झाले. आणि मोदी उदयानंतर राजकीय गप्पा तर पार भारत महासत्ता होण्यापासून, यूपीएससी करणाऱ्यांनी तलाठ्याची परीक्षा देण्यापर्यंत पोहोचल्या. असो.
विठाबाई नारायणगावकर – आयुष्याचा तमाशा झालेली कलावंत
त्यानंतर मग पोरांची वाट लावण्यात मोठा वाटा आहे तो क्लासेसचा. धर्माधिकारी सरांनी राजकीय इच्छेने आयएएस सोडल्यानंतर व भाजपने त्यांना तिकीट न दिल्यामुळे; सरांनी मग ‘कार्यकर्ता अधिकारी’ घडवायच्या नावाखाली ‘चाणक्य मंडळ’ नावाचा एक आदर्शवादी क्लास सुरू केला. सरांचंही वक्तृत्व चांगला असल्यामुळे अनेक ढक्कलपास पोरं सुद्धा ह्या धंद्याला लागली. नंतर स्टडी सर्कल, युनिक वगैरेंनी या धंद्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप आणलं. मग डायरेक्ट बारावी नंतरचे पोरं कॉलेजात व्यक्तिमत्व विकास करायचा सोडून; घटनेची कलमं, गव्हर्नर जनरल आणि खजुराहोचे शिल्प कोणी तयार केले, हे वाचून स्वतःला ज्ञानी समजू लागले. आता तर शाळेपासूनच पोरं शेंबूड पुसत मला कलेक्टर व्हायचं असं सांगतात. आधी डॉक्टर-इंजिनिअर तरी सांगायचे. माझ्याच नात्यातली एक व्यक्ती सांगत होती की मला पोराला IAS बनवायचं आहे. सध्या त्यांचा पोरगा सहा वर्षाचा आहे. त्यांनी पोराकडून अनेक थुकराट देशांच्या राजधान्या पाठ करून घेतल्याय. उदाहरणार्थ थायलंडची राजधानी बँ’कॉंक’ वगैरे. ह्या राजधानीचं नाव इंग्लिशमध्ये सुद्धा डबल मीनिंग वाटतं, त्याविषयी अधिक काय बोलावं. असो. रट्टा मारायला अभ्यास समजणारे अनेक महान लोक्स, मी माझ्या ह्या चक्षूने पाहिलेत.