रक्षाबंधन
Rakshabandhan
राजा शिशुपालशी झालेल्या युद्धात कृष्णाच्या बोटाच्या दुखापतीची आख्यायिका आहे.कृष्णाच्या कापलेल्या बोटातून रक्तस्त्राव झाला आणि द्रौपदी त्याला जखमी झालेले पाहणे सहन करू शकली नाही.
त्यामुळे तिने तिच्या साडीची एक पट्टी फाडली आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्या मनगटाभोवती बांधली. तिच्या प्रेम आणि काळजीमुळे कृष्णाने स्वतःला तिचा भाऊ म्हणून बांधील असल्याचे सांगितले आणि राखीचा जन्म झाला.
आणि त्याने तिचे संरक्षण करण्याचे वचनही पूर्ण केले. बर्याच नंतर कौरव तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कृष्णाने हस्तक्षेप करूत तिची साडी अनंतापर्यंत लांबवली आणि तिचा सन्मान वाचवला होता.
ऐतिहासिकदृष्ट्या, राज्यांमधील राजकीय संबंध दृढ करण्यासाठी राखी साजरी केली जात असे. पोरसने आपले भाऊ असणे लक्षात ठेवत अलेक्झांडर वर प्रहार करण्याचे टाळले होते केले कारण अलेक्झांडर ची पत्नी रोक्सानाने पोरस ला राखी पाठवत पतीचा जीव परत मागितला होता.
हुमायून आणि चित्तोडची राणी कर्णावती
यांची ही कहाणी मध्ययुगामध्ये रक्षाबंधन साठी प्रेरकच आहे.
मुघल सम्राट हुमायूने आपले बंधुत्वाचे वचन पाळण्यासाठी चित्तोड राज्याला मदत केली होती. चितोडची राणी कर्णावती यांनी आपल्या राज्याचे गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या आक्रमणापासून संरक्षण करण्याची विनंती करून मोगल सम्राट हुमायुला राखी पाठवली होती.
बहादूरशहाने राज्यावर आक्रमण केले आणि राणी कर्णावतीने इतर स्त्रियांसह, बंदिवास टाळण्यासाठी मृत्युला जवळ केले होते. यानंतर हुमायूने राज्य पुनस्थापित करून राणी कर्णावतीच्या मुलाला, आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून पाठवलेल्या राखीचा सन्मान करत पुन्हा राज्य मिळवून दिले होते.
आधुनिक भारताच्या इतिहासात
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस बंगालच्या फाळणीचा दिवस म्हणून आपणा सगळ्यांना माहिती आहे .
रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनच्या दिवसाचा उपयोग स्वातंत्र चळवळीमध्ये चेतना जागवण्यासाठी करण्याचा निर्णय रवींद्रनाथ टागोर यांनी घेतला आणि बंगालमध्ये रक्षाबंधन उत्सव सुरू झाला.
गुरुदेव टागोरांनी बंगालमधील तमाम जनतेला रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना बंगालमधील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अभूतपूर्व एकी दिसून आली आणि हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकांना या दिवशी राख्या बांधण्याचा कार्यक्रम अगदी जाहीर रीतीने केला.
हा रक्षाबंधन साजरा करताना टागोर यांनी गंगा नदीमध्ये स्नान करून या रक्षाबंधन उत्सवाची सुरुवात केली वाटेमध्ये
भेटणार्या प्रत्येकाला ते राखी बांधत आणि पुढे जात. ही राखी बांधताना त्यांनी मशिदीमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या मौलवींना देखील राखी बांधली होती.
यावेळी बंगालमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला होता. रवींद्रनाथ टागोरांनी ‘बंगलार माती बंगलार जल ‘ नावाचे एक सुंदर गाणं या वेळी लिहिलेलं होतं. बंगालमधील तमाम लोक रक्षाबंधन उत्सवामध्ये सहभागी होताना हेच गाणं म्हणत सहभागी झाले होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी इतिहासातील रक्षाबंधनाचे महत्त्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा.
आणि हो रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं सुंदर गाणं नक्की ऐका खूप खूप धन्यवाद..