तू आलीस माझ्याकडे
अगदी प्रेमाने
संपूर्ण समर्पणाने
पण तुझ्या सावलीचे काय करू… ?
म्हणजे मला त्रास नाही तुझ्या सावलीचा
पण तुझाच वर्तमान तू बिघडवते आहेस
हे लक्षात कसं येत नाही तुझ्या?
की तुला सवय झाली आहे गुलामीची?
हो, तू म्हणशील,
“सावली कशी टाळता येणार?”
अर्थातच नाहीच टाळता येत…
पण तो बल्ब तर बदल
जो भुतकाळात खुरडा प्रकाश देऊन
तुला जगवल्यासारखं करत होता…
काय मिळाले तुला ?
एवढ्याशा चिमुकल्या प्रकाशासाठी
स्वतःच्या सावल्या
स्वतः पेक्षा लांबलचक केल्यास तू…
आणि वैराण जगलीस…
फालतू उपकाराच्या साखळदंडानी वेढून,
त्यानी शोषलं तुला..
कवडीचा भाकरतुकडा देऊन…
स्वतःचे नावही देईल कदाचित तो तुला…
मग तर मंगळसुत्राची पवित्र जोखड मिरवीत
वडाला फेऱ्या घालत बसशील
त्याची जोडवी पायात करकचवून..
कुठलं पाऊल कुठे आणि कधी उचलायचं
हे त्याच्या मर्जीने ठरवत… !
तो झिरोचा बल्ब
हिरो समजून चालत राहीलीस
त्या सावलीचे म्हणतोय मी… .!
कळतंय का?
अगं बघ जरा स्वतःला
स्त्री आहेस तू..!
सोशिकता तुझा गुण असला म्हणून,
अन्याय सहन करत बसण्याचा गुणधर्म
बाळगला पाहीजे असे नाही…
का घाबरतेस अंधाराला?
का लागतो कवडीमोलाचा आधार..?
जो प्रकाश तुझ्यातले दिवे विझवत असेल
उलट तुझ्या सावल्या गडद करत असेल,
तर सोड ती सावली बनवणाऱ्याची संगत
बघ स्वतःकडे… ,
तूच एक ज्योत आहेस,
निसर्गाने पेरलेयंत तुझ्यात
हजारो वॅटचे दिवे… . !
बस् फक्त तुझ्या आत्मविश्वासाचा
फ्यूज तेवढा उडालाय…
तो बसव
आणि हो की दैदिप्यमान…
तू स्त्री आहेस
सगळा आसमंत तुझ्यामुळे लखलखेल…