सामाजिक

चंदनाचे हात, पायही चंदन – डॉ. अनिता अवचट

तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ, खोड, सारे काही चंदनच असते. पुढे ते म्हणतात परिसाचे कुठलेच अंग हीन नसते. दिव्यात कुठेही अंधःकाराला जागा नसते. साखर सगळीकडून गोडच लागते. त्याचप्रमाणे सज्जन हे सर्वबाजूंनी सज्जनच असतात. त्यांच्यात अवगुण शोधूनही सापडत नाही. या अभंगातील तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेली सज्जनांची लक्षणं पाहिली की मला आमच्या मोठ्या मॅडम म्हणजे डॉ. अनिता अवचट आठवतात. चंदनाचे झाड सर्व बाजूंनी चंदनच असते तसे मोठ्या मॅडमचे सारे व्यक्तीमत्वच सेवाव्रती होते. मुक्तांगणच्या संस्थापक असलेल्या मोठ्या मॅडमनी आयुष्याची शेवटची काही वर्षे ब्रेस्टच्या कर्करोगाशी झूंज दिली. व्यसनमुक्तीचे काम हा त्यांच्या आयुष्यभराचा ध्यास होता. त्या कार्याने त्यांचे आयुष्य व्यापले होते. त्यामुळे त्यांना आपल्या या दुर्धर आजाराला फक्त जरा सरकून बसायला जागा करून दिली आणि त्या आपला घेतलेला सेवेचा वसा चालवत राहिल्या.

त्यांचे व्यक्तीमत्वच रंजल्यागाजलेल्यांच्या सेवेने व्यापलेले होते. येरवडा रुग्णालयातील नोकरी, मुक्तांगणमधील काम आणि हमाल पंचायतीसाठीसाठी चालवलेला फुकट दवाखाना या व्यतिरिक्त असंख्य कामे मोठ्या मॅडम करीत असत. वृद्धाश्रमात जाऊन तेथिल लोकांना धीर देणे, ओतूर या गावी जावून प्रायमरी हेल्थ सेंटर चालवणे, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन ज्या मुलांना आपण हातही लावायला धजणार नाही अशा खरजेने भरलेल्या मुलांना आंघोळ कशी घालायची त्यांना मलम कसे लावायचे ते त्यांच्या आयांना करून दाखवणे, नखे कशी काढायची हे शिकवणे हे जणू त्यांचे छंदच होते. अतिशय सहजतेने त्या आपल्याला अशक्य वाटतील अशी काम करीत असत. माझ्यासारख्याला त्यांना अतिशय विलोभनीय वाटणारा गुण म्हणजे त्यांनी एखाद्या विद्वान पंडिताप्रमाणे आपला वेळ निरनिराळे पेपर प्रकाशित करण्याला दिला नाही. त्यांनी सारा वेळ सेवेत घालवला. म्हणूनच त्यांचे सर डॉ. मूर्ती मोठ्या मॅडमचे काम पाहून म्हणाले होते की तुझ्याकडून पेपर्सची अपेक्षाच ठेवता येणार नाही. तुझी कॅटेगरी मदर तेरेसासारख्या माणसांची आहे.

ओतूरला मोठ्या मॅडमचे काम खूप प्रसिद्ध झाले होते. शेकडो माणसे तेथे येत. त्यांच्या हाताला गुण आहे म्हणून अगदी पहाटेपासून रांगा लावून लोक बसत असत. वास्तविक ओतूर हे बाबांचे म्हणजे डॉ. अनिल अवचट यांचे गाव पण आपल्या कामामुळे मोठ्या मॅडम तेथे प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढे मुक्तांगणचे मोठे काम उभे राहिले. मोठ्या मॅडमनी आपल्या आयुष्याचा सारा अनुभव तेथे ओतला. रुग्णालयातील मेंटल वॉर्डमध्ये रुग्णांनी आत्महत्या करु नयेत म्हणून त्यांच्या लेंग्याला नाडी ठेवत नसत. लेंगे हातांनी धरून चालणारी ती रुग्ण मंडळी केविलवाणी दिसत. मोठ्या मॅडमनी मुक्तांगणमध्ये पाढऱ्या रंगाला प्राधान्य दिले आणि व्यवस्थित पोशाखाची सोय केली. त्यांनी आपल्या रुग्णांमधून समुपदेशक उभे केले जे आजही मुक्तांगणमध्ये कार्यरत आहेत. मोठ्या मॅडमना व्यसनमुक्ती म्हणजे फक्त व्यसनापासून दूर राहणे अभिप्रेत नसावे. त्यांना माणसाचा सर्वांगिण विकास हवा होता. त्यामुळे त्यांनी व्यसनापासून दूर राहिलेल्या रुग्णांची लग्नं लावून दिली आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.

पुढे मोठ्या मॅडमना ब्रेस्टच्या कर्करोगाने गाठले. त्याचा त्यांच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी त्यांचा “तरी बरं” हा महामंत्र तेथे वापरला. त्या म्हणत तरीबरं कॅन्सर झाला. हार्ट एटॅक आला असता किंवा अपघात झाला असता तर वेळच मिळाला नसता. कॅन्सरवर उपचार आहेत. असे म्हणून त्यांनी आपल्या आवडत्या मुक्तांगणमध्ये स्वतःला झोकून दिले. केमोचे उपचार घेण्यासाठी मोठ्या मॅडम बाबासमवेत मुंबईला जात. उपचार घेऊन आल्यावर विश्रांती ऐवजी त्या कामाला लागत. जणू काम हेच त्यांच्या आजारावरचे औषध होते. त्या दरम्यान त्यांचे केस गेले. पण ते ही त्यांनी अतिशय शांतपणे स्वीकारले होते. त्यांचा सेवेचा ध्यासच इतका जबरदस्त होता की त्यांना या गोष्टी फारशा महत्वाच्या वाटत नसाव्यात. पुढे आजाराने आपले काम केले. पण त्या अगोदर मोठ्या मॅडमनी मुक्तांगणची उपचार पद्धती सुस्थापित केली होती.

पूर्णपणे भारतीय जीवनपद्धतीवर आधारित गांधी तत्वज्ञानाची गुंफण असलेली अशी ही अद्वितीय उपचारपद्धती देऊन मोठ्या मॅडम गेल्या. रुग्णाशी कसे वागावे, त्यांच्या कलाने वागून, त्याची आवड निवड लक्षात घेऊन उपचार कसे करावेत याचा वस्तुपाठ त्यांनी आमच्यासमोर ठेवला. मोठ्या मॅडमची आपल्या रुग्णांशी वागण्याची पद्धत पाहिली की समुपदेशनात रुग्णाशी विश्वासाचे नाते कसे प्रस्थापित करावे याचे धडे मिळतात. त्यांना आपल्या सर्व रुग्णांची नावे ठावूक असत. त्यांची परिस्थिती ठावूक असे. त्यांचे सर्वांशीच जणू वैयक्तीक नाते होते. मी मुक्तांगणला संशोधनानिमित्त जाऊ लागलो त्याच्या अनेक वर्षे आधीच मोठ्या मॅडम गेल्या होत्या. मात्र त्यांचे अस्तित्व तेथे आजही मुक्तांगणच्या उपचारपद्धतीच्या निमित्ताने जाणवते. मोठ्या मॅडमसोबत काम करण्याचे भाग्य मिळाले नाही. मात्र त्यांनी आखून दिलेल्या उपचारपद्धतीवर चाललेल्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या मुक्तांगणमध्ये काम करण्याचे भाग्य मिळाले. ही मला फार मोठी मिळकत वाटते. मोठ्या मॅडमच्या पायावर डोके ठेवून नवरात्रीच्या निमित्ताने आशीर्वाद मागताना त्यांच्यातील सेवाभावाचा काही अंश मला मिळावा हेच मागणे त्यांच्याकडे मागावेसे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button