कामात काम
“अगं तुला अधिकचं काम हवे होते ना?”, रखमा घरात पाऊल ठेवते न ठेवते तोच निर्मला बाईंनी प्रश्न विचाराला.
“व्हयं बाईसाहेब. तुम्हाला तर माहितच आहे सध्या पैशाची …”.
“हो हो, तुझी सगळी कहाणी मी दहावेळा ऐकली आहे. तर आपल्या आळीतल्या शेवटच्या घराची साफ सफाई करायची आहे. अंगणात बाग आहे, तिथली झाडलोट. परसात झाडे आहेत, तिथली झाडलोट आणि मुख्य घराची साफ सफाई. असे सगळे काम आहे बघ. माझ्या इथून निघालीस की थेट त्यांच्या घरी. तिथून मग दुपारहून सुट्टी. तुझा दिवस कसा जाईल तुलाच कळणार नाही.”
निर्मला ताई सांगत होत्या आणि रखमा निमूटपणे ऐकत होती. “अगं उभी काय, एकीकडे कामा लाग. माझा आपला पट्टा चालूच राहणार.”
“व्हयं ताई, पण तिथं तर कोणच राहात नाय. मग माझ्या कामाचा पैका कोण देणार.” आता मात्र रखमेने एका हातात झाडू घेऊन एकीकडे बाहेरची खोली झाडायला घेतली.
“अगं कोण देणार काय, कोणी नाही दिला तर मी देईन हो तुला. अशी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि आमच्या ह्यांचेच मित्र आहेत ते.” निर्मलाताईंचा पट्टा आणि रखमेचा हात एकत्रच चालू लागले. “परदेशात व्यापार करतात. कंटाळले म्हणे नात्यागोत्यांपासून. म्हणून तिकडचे सगळे बंद करून इकडे येणार आहेत. एव्हाना निघालेही असतील. फक्त आमच्या ह्यांना फोन करून सांगितले आहे. तू पण कोणाला सांगू नको हो”. कोणाला सांगू नको म्हणत त्या आजूबाजूला पाहू लागल्या तर रखमा एव्हाना दुसऱ्या खोलीत गेली पण होती.
सगळी कामे झाली तशी ती निघाली. जाताना त्या घराची चावी घेतली, कामे नीट समजून घेतली आणि थेट आळीतल्या शेवटच्या घराचा रस्ता धरला.
घर तसे छोटेच होते. दोन तीन खोल्या खाली आणि पाच सहा खोल्या वरती. अंगण आणि परस मात्र छान पसरलेला होता. सगळीकडे पालापाचोळा धुळीचे साम्राज्य होते. तिने नवऱ्याला सखारामला फोन केला आणि मिळालेल्या कामाविषयी सांगितले. हाताशी एवढे काम मिळालेले ऐकून सखाराम भलताच खूश झाला.
“तू काम सुरू तर कर, मी आलोच बघ मदतीला.”
सखाराम येई तो रखमेने घर साफ करायला घेतले. “तू घराची साफ सफाई बघ, मी अंगण आणि परस बघतो.”, सखारामने पटकन काम वाटून घेतले आणि कामाला लागलाही. बागेतली बहुतेक झाडे करपून गेली होती. त्याने सगळा पालापाचोळा काढला, वाळले गवत काढले, माती सारखी केली. दुपार होईतो, रखमेची कामेही होत आली. एवढ्यात मोठी मुलगी जेवणाचा डबा घेऊन आली. एवढ्या उन्हाचे ती चालत आली, म्हणून रखमेने कौतुकाने चेहऱ्यावरून हात फिरवला. जेवण झाले तसे रखमेने मुलीला माघारी धाडले. दोघांनी तिथेच थोडा आराम केला आणि मग उन्हं उतरत आली तसा घराचा रस्ता पकडला.
मधले दोन दिवस असेच गेले आणि सकाळीच निर्मलाताई रखमेला म्हणाल्या, “देसाईंना तुझे काम आवडले हो. घर सफाईला तुला तर बागकामासाठी सखारामला विचारत होते. मी हो म्हणून टाकले आहे, जाल ना तुम्ही दोघे?”
“कोण देसाई? कसले काम?”
“अगं असे काय करते. परवा नाही का ज्यांच्या बंगल्याची साफसफाई तुम्ही केलीत, ते देसाई साहेब.”
“बरं बरं, ते होय. काम चांगले आहे ताई, मिळाले तर बरेच होईल. आणि खरेच का हो, सखारामला घेतील कामावर? नाही म्हणायला छोटी मोठी काम मिळतात त्याला. पण नक्की काही नाही बघा.”
निर्मला ताईंचे काम संपताच रखमा सखारामला घेऊन देसाई साहेबांच्या घरी गेली. तोंड ओळख झाली, माणसं विश्वासू वाटली आणि कामाला सुरूवात झाली. रखमा आणि सखाराम यांचा दिवस देसाई साहेबांच्या घरी जाऊ लागला.सखारामला बाग कामाची आवडही होती आणि जाणही होती, त्यामुळे देसाई साहेब खूश होते. त्यांची वर कामे पण तो करून द्यायचा. जसे की बाजारात जाणे आणि गाडी धुऊन देणे.
देसाई साहेबांना भारतात येऊन चार पाच महिने झाले. परदेशातून बक्कळ पैसा कमवून जरी आले असले तरी मुळचा कष्टकरी स्वभाव स्वस्थ बसून देईना. त्यांनी रंगांचा कारखाना काढायचे ठरवले. परदेशातही त्यांचा हाच व्यवसाय होता. आता तो इथे भारतात सुरू करायचे ठरवले. भांडवल तयार होते, जवळच्याच औद्योगिक क्षेत्रात चांगली जागाही मिळाली. पण हाताखाली हवी होती विश्वासू माणसे.
त्यांनी एके दिवशी थेट सखारामलाच विचारले, “सखाराम हे बागकाम आणि बाजारकाम खूप झाले. तू विश्वासू आहेस, मेहनती आहेस, तुला चांगली नोकरी मिळायला हवी.”
“खरय साहेब, पण मला नोकरी कोण देणार? आमची जुनी कंपनी चालू होती तेव्हा मान होता, शान होती. अगदी सुपरवायझरच्या हुद्द्यापर्यंत पोहचलो होतो.”, जुन्या दिवसांची आठवण होताच सखाराम शांत झाला.
“बस झाल तर मग. आपला कारखाना सुरू होतोय. त्यासाठी मला विश्वासू कामगार लागतील. तू तुझ्या ओळखीतली दहा पंधरा चांगली माणसे बघ, त्यांना घेऊ कामावर. तू त्यांचा सुपरवायझर. ठरलं तर मग.”
“पण मग तुमचे बागकाम?”
“त्यासाठी आणखी सखाराम मिळतील, पण हा सखाराम आता सुपरवायझर होणार.”
रखमा भिंतीआडून हे समदं ऐकत होती. ती पुढे आली आणि सखारामला म्हणाली, “अहो, बघताय काय? जोडीनं साहेबाच्या पाया पडूयात.”
“अरे माझ्या नाही, जाऊन निर्मला ताईंच्या पाया पडा.”
“व्हयं खर हाय साहेब.” दोघे आनंदाने निर्मला ताईंच्या घराकडे निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे देसाई साहेब समाधानाने पाहात होते. तर सखाराम अधूनमधून आकाशाकडे पाहून नमस्कार करत होता, त्याने कामात काम मिळवून दिले होते.