नवीन पोस्ट्स

ब्रम्हपुत्रा नदीबद्दल माहिती (Brief information about Brahmaputra River)

नमस्कार मित्रांनो, 

नदी ही लाखो करोडो लोकांचे जीवन समृद्ध करत जाणारी जणू एक भाग्यरेषाच असते. भारतामध्ये अशा प्रचंड मोठमोठ्या भाग्यरेषा अर्थात नद्या बघावयास मिळतात. आजच्या या लेखामध्ये आपण ब्रह्मपुत्रा या भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या नदीबद्दल माहिती बघणार आहोत.…

ब्रम्हपुत्रा नदीबद्दल प्राथमिक माहिती (Brief information of Brahmaputra River)

मित्रांनो ब्रह्मपुत्रा ही भारतीय उगमाची नदी नाही, तिचा उगम तिबेट या चीनमधील ठिकाणी समुद्रसपाटीपासून 5051 मीटर उंचीवर होतो. ही नदी भारतीयांच्या धार्मिक महत्त्व असणाऱ्या कैलास पर्वत श्रेणीमध्ये उगम पावल्याने, भारतीयांसाठी ही नदी फारच पवित्र मानली जाते. ही नदी आपल्या प्रवासाबरोबरच आपली नावेही बदलत जाते.

भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाणारी ही नदी उगमाजवळ मात्र त्संग पो या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच ब्रह्मपुत्राच्या पात्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जगभरापैकी नदीपात्रामध्ये असणारे सर्वात मोठे बेट अर्थात “माजुली बेट” हे ब्रह्मपुत्राच्या पात्रामध्ये आहे. ज्याला अलीकडेच सर्वात छोटा जिल्हा म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. हे माजुली बेट आसाम या राज्यामध्ये आहे.

 आपल्या अविरत प्रवासात 2900 किलोमीटर धावून एकाधिक देशांमधील लाखो लोकांचे जीवन समृद्ध करणारी नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा .

काही आख्यायिका नुसार ब्रह्मपुत्रेचा उल्लेख ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून ब्रह्मपुत्र असा केलेला आढळून येतो. म्हणूनच काही लोक ब्रह्मपुत्रा नदीला ब्रह्मपुत्र असे म्हणूनही ओळखतात.

ब्रह्मपुत्रेचा उगम (Origin of Brahmaputra  River)

मित्रांनो वर उल्लेख केल्याप्रमाणे चीनच्या तिबेट स्थित कैलास पर्वतामध्ये मानसरोवराच्या दक्षिणेस ब्रह्मपुत्रा ही नदी उगम पावते. आपल्या उगमापासून ही नदी 2900 km वाहते ज्यापैकी सुरुवातीला पश्चिम पूर्व दिशेने 800 किलोमीटर वाहते. यादरम्यान तिला  “त्संग पो” म्हणून ओळखले जाते. स्थानिक तिबेटी भाषेमध्ये याचा अर्थ “शुद्ध करणारी” असा होतो. पुढे भारताच्या हद्दीत प्रवेश करताना तिचे नाव ब्रह्मपुत्रा असे होते. भारतातून ही नदी फक्त 720 किलोमीटर वाहत असली तरी आपल्या प्रवासादरम्यान तिने अनेक समृद्ध प्रदेशाची निर्मिती केली आहे. ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने 8 लाख 48 हजार 488 चौरस किलोमीटर इतके प्रचंड क्षेत्र ओलिताखाली आणले आहे.

चीन भारत आणि बांगलादेश अशा तीन देशांमधून प्रवास करताना ही नदी वेगवेगळी नावे धारण करते.

 सर्वप्रथम “त्संग पो” या नावाने उगम झाल्यानंतर भारतामध्ये “ब्रह्मपुत्रा” नावाने प्रवेश करते. पुढे बांग्लादेश मध्ये गेल्यावर गंगा या नदीला मिळताना ब्रह्मपुत्रेचे नाव “पद्मा” असे होते. तर बराक नदीशी मिलाप झाल्यावर तिला “मेघना” असे म्हणतात. तर बंगालच्या उपसागराला मिळताना हिचेच नाव पुढे “जमुना” असे होते.

ब्रह्मपुत्रेच्या महत्त्वाच्या उपनद्या (Important sub-rivers of Brahmaputra)

 उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या:

मित्रांनो ब्रह्मपुत्रेला उजव्या बाजूने धुबरी, तीस्ता, मानस, आणि सुबनसिरी या नद्या मिळतात.

डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या:

ब्रह्मपुत्रेस डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांमध्ये दिवंग आणि लोहित यांच्या एकत्रित प्रवाहाने तयार झालेली दिहांग, धनसिरी, कोपिली आणि बराक (जिला सुरमा या नावानेही ओळखले जाते) या नद्या आहेत.

त्याचप्रमाणे ब्रह्मपुत्रेच्या काठावर गोरोईमारी, दिब्रुगड, धुब्री, गोलपाडा, आणि तेजपूर इत्यादी शहरे देखील वसलेली आहेत.

ब्रह्मपुत्रा खोऱ्याची महत्वपूर्ण माहिती (Important information of Bramhaputra river basin)

ब्रह्मपुत्रा एक हिमनदी असल्याने वसंत ऋतूतील बर्फ वितळल्यामुळे या नदीला पुराचा धोका वाढतो. ही एक वृक्षाकार जलप्रणाली असणारी नदी असल्याने ब्रह्मपुत्राचा मूळ प्रवाह आणि उपनद्यांच्या प्रवाहामुळे या नदीचे पाणी प्रचंड प्रमाणात वाढते. त्यामुळे या नदीचा प्रवाह जवळपास 19000 मीटर प्रति सेकंद इतका वाढतो. परिणामी या नदीपात्रात तात्पुरत्या वाळूच्या पट्ट्या निर्माण होतात. तसेच हा प्रचंड पूर प्रवाह नदीच्या तटिय भागांमध्ये मृदा धुपीला मोठ्या प्रमाणावर चालना देतात. या धुपिला नियंत्रणात आणणे अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणूनच 1954 पासून विविध पूर नियंत्रक प्रकल्प, बंधारे, बांध इत्यादी कामाला सुरुवात केली आहे. याच प्रेरणेतून भारत सरकार द्वारा 31 डिसेंबर 1981 रोजी “ब्रह्मपुत्रा मंडळ” म्हणून गुवाहाटी येथे एक मंडळ नेमण्यात आले आहे. जे ब्रह्मपुत्रेच्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून ब्रह्मपुत्राची धूप कमी करणे, तिच्या पाण्याची योग्य व्यवस्थापन करणे, तसेच या पाण्याचा वापर करून जलसिंचन, वीजनिर्मिती तसेच वाहतुकीसाठी उपलब्धता करून देणे, इत्यादी कार्य पार पाडते. या नदीच्या प्रवाह वेगावरून या नदीची जलविद्युत क्षमता भरपूर आहे, मात्र असे असले तरीही या नदीचा जलविद्युत निर्मिती करता फारसा वापर केलेला आढळून येत नाही.

ब्रह्मपुत्रा आपल्या प्रवासादरम्यान अनेकविध हवामानांच्या संपर्कात येते. ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये कोरड्या व थंड हवामानातून तर त्याच्या अगदीच विरुद्ध बांगलादेश मध्ये उष्ण व आर्द्र हवामानाच्या क्षेत्रातून वाहताना दिसते. भारतीय परिक्षेत्रात ब्रह्मपुत्रेच्या आसाम खोऱ्यामध्ये रेझिन उत्पादन अधिक आढळून येते. कारण या नदीपरिक्षेत्रात रेझिन उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या साल वृक्षाबरोबरच बांबू आणि फळझाडे हे वृक्ष देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. तसेच आसामच्याच परिक्षेत्रात या नदीच्या खोऱ्यामध्ये अतिशय दुर्मिळ असा एकशिंगी गेंडा आढळतो. सोबतच हत्ती आणि वाघ यांचा देखील सहवास आढळतो.

मित्रांनो आजच्या ब्रह्मपुत्रा नदी या विषयावरील माहितीने आपल्या ब्रह्मपुत्रा विषयीच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना वाचण्याकरिता ही माहिती नक्कीच शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button