समजपूर्वक थांबावं….
केळीच्या चिरलेल्या पानासारखी,अत्यंत नाजूक अवस्था होते काही नात्यांची.
शिवायला गेलं तर अजूनच फाटण्याची भीती…
झालेले गैरसमज, ते दूर करण्यासाठी न साधलेले संवाद, कमी अथवा अति बोलण्यामुळे आलेला दुरावा, आणि शेवटी अबोल्यावर झालेली सांगता, ही एक दीर्घ प्रक्रिया असते.
प्रक्रियेदरम्यान समोरच्यातले हेलकावे वेळोवेळी जाणवतही असतात.
पण तोवर समोरच्याला शेंदूर फासण्याचा कार्यक्रम उरकूनही टाकलेला असतो आपण.
आणि मग
“काहीच तर घडलं नाही…
तरीही समोरचा इतकं टोकाचं का वागला?
मी समोरच्याला किती जीव लावला,तरीही तो मला प्रचंड दुखावून गेला..
माझं काय चुकलं?
त्याचं किती चुकलं?”
हे प्रश्न, गुंते सोडवत बसण्याचे निरर्थक उद्योग सुरू होतात .
पण आपल्यातल्या माणुसपणाच्या पृष्ठभागावरची धूळ किंचित झटकल्यावर, आणि अगदी तळाशी जाऊन चिंतन केलं तर हे लख्ख होतं की, आपण समोरच्यावर केलेलं प्रेम, भावनिक गुंतवणूक, दिलेला वेळ, हा काही त्याच्यावर केलेला उपकार नसून, ती त्या त्या काळातली ‘आपली’ गरज होती. ‘आपल्यासाठी’ ते आनंददायी होतं म्हणून त्याच्याप्रती समर्पित होतो आपण.
म्हणजेच त्यामागे आपला अतिसूक्ष्म, सुप्त स्वार्थही दडलेला होता.
कटू असलं तरी सत्य आहे हे !
आयुष्यात येणारा प्रत्येक अनुकूल माणूस तितक्याच तीव्रतेची एक प्रतिकुलताही सोबत घेऊन आलेला असतो.
पण आपल्याला तो समग्र नको असतो. त्याच्यातली फक्त अनुकूलता हवी असते आपल्याला.
गंमत म्हणजे कुठल्याही वादात
‘मी पूर्णपणे बरोबर आहे!’ यावर दोन्ही बाजू ठाम असतात.
मग अशा वेळी स्वतःला दोन पद्धतींनी तपासून बघावं.
‘मला होणारा त्रास मानसिक आहे की हार्दिक?’ हे स्वतःलाच विचारावं.
जर तुम्ही आदळआपट करत असाल, समोरच्याच्या चुकांची गणितं मांडत स्वतःचं पारडं कसं जड आहे हे स्वतःलाच समाजावत असाल, कुठल्यातरी मोह, फायद्यापासून वंचित झाल्याचं नुकसान सलत असेल, समोरच्याने आपला अहंकार न कुरवळल्याचं दुःख वाटत असेल, तर तुम्हाला होणारा त्रास ‘मानसिक’ आहे.
म्हणजेच तुम्ही नक्की कुठेतरी कमी पडलेले, चुकलेले असता.
अशावेळी आपली सगळी तत्वं,अहंकार, रुसवा बाजूला ठेऊन समोरच्यापर्यंत जाण्यासाठीच्या 99 पायऱ्या न थकता, जरूर चढाव्यात.
(“मी माझ्या बाजूने सगळे प्रयत्न केले”, असं म्हणत दहाव्या पायरीवरूनच थकून परत फिरू नये.)
पण जर चूक- बरोबरची गणितं न मांडता, “आपल्यामुळे नकळत समोरच्याला त्रास झाला,” असं वाटून तुमचे डोळे भरून येत असतील, त्याला अजून त्रास नको म्हणून तुम्ही संयमाने शांत बसत असाल,
तर तुमचा त्रास ‘हार्दिक’ आहे,
तुम्ही नितळ, स्वच्छ आहात.
तुम्ही न केलेल्या अथवा नकळत केलेल्या चुकीबद्दल समोरचा तुम्हाला शिक्षा देतोय हे समजून घ्यावं.
आणि ‘आपले हेतू दुष्ट नव्हते’, हे एकदा नेणिवेत कळून चुकलं, की तिथून पुढं मात्र कुठलाही क्लेश करून न घेता स्पष्टीकरणं देणं, कुठलेही प्रयत्न करणं बंद करावं.
दोघांच्याही पारड्यात एकमेकांबद्दलचा आदर, आपुलकी, ओढ, विश्वास टाकून पहावा. आणि तफावतीचा आलेख चढता असेल,लक्षणीय असेल तर तिथेच थांबून, कुठलीही तक्रार, कुठलाही आरोप न करता, त्याला कसलाही धक्का लागणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घेत किंचित बाजूला सरकून पुढे निघून जावं.
तिथून पुढं त्याला डिस्टर्ब करणं आणि आपणही पोतराजासारखे स्वतःच्या पाठीवर फटके मारून घेणं बंद करावं.
पण अडचण अशी असते की आपल्याला प्रत्येकच गोष्टीची जबाबदारी घेण्याची सवय लागलेली असते. आपले प्रश्न आपण नाही तर कोण सोडवणार असं म्हणत, निरनिराळे प्रयोग करण्याच्या नादात परिस्थिती अजूनच क्लिष्ट करून टाकतो.
पण आपल्या काहीही न करण्यामुळेही या जगातील अनेक गोष्टी सुरळीत सुरू आहेत, हे लक्षात घेऊन आपल्या स्वतःच्या जगातल्या समस्यांकडेही तटस्थपणे, साक्षीभावाने पाहता यायला हवंय.
अगदीच सरळ भाषेत सांगायचं झालं तर
“मी शिक्षक आहे, मला शाळेत जाऊन माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत, जीव ओतून अध्यापन करायचं आहे.”
इतकंच ध्यानात घ्यावं.
पण त्यानंतर ‘ती मुलं कलेक्टर झाली, की शिपाई?’ यासाठीही स्वतःला जबाबदार धरू नये. इतकं तटस्थ जगता यायला हवंय.
एकेकाळच्या अतिप्रिय नात्यातून सहीसलामत बाहेर पडणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. कितीही काळजी घेतली तरी बाहेर पडताना थोडेबहुत तरी ओरखडे उमटतातच .
पण निव्वळ अशक्यही नसतं ते.
प्रचंड भूक लागलेली असताना, नेमकं जेवायला बसताना ‘अन्नात विष टाकलेलं आहे’, असं जर कुणी सांगितलं तर पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाच्या मोहालाही आवर घालतो आपण.
कारण त्यातलं विषतत्व कळून चुकलेलं असतं.
अगदी तसंच अशा काही नात्यांतील विषतत्वेही अत्यंत गांभीर्याने घ्यावीत.
‘एकमेकांना दिलेल्या शिव्याही केवळ तिरीमिरीत बोलले गेलेले शब्द आहेत’, असं जोपर्यंत वाटतं, तोपर्यंत सगळं आलबेल असतं.
पण बोललेल्या हरेक शब्दाचा शब्दशः अर्थ काढून, एकमेकांच्या हेतूंवर संशय घेऊन, वाद, प्रतिवाद सुरू झाले, की नात्याला उतरती कळा लागली असं समजावं.
नात्यात मतभेद, आदळआपट, चिडणं, रुसणं, रागावणं, हे अगदीच किरकोळ चढउतार असतात.
पण जेव्हा एकमेकांना बारीक टोचण्या देऊन खोलवर घाव देण्याची अघोरी मालिका सुरू होते, तेव्हा मात्र एक हळवा पण टोकदार संघर्ष सुरू होतो.
कुठल्याही परिस्थितीत जर आपली कायम फरफटच ठरलेली असेल, समोरचा आपल्याला आपली जागा दाखवण्याची एकही संधी सोडत नसेल, किंवा आपल्या हेतूंवर संशय घेत, अवहेलना,अपमानित करत आपलं शोषणच करत असेल, तर मात्र नातं कितीही मोहक असलं तरी तिथं रेंगाळू नये.
आपल्याला आयुष्याच्या गणितात कुठल्याही तोट्याशिवाय केवळ फायदा हवा असतो. आणि यामुळे अनेक गोष्टींना धड सोडतो, ना धड धरून ठेवण्याचं धाडस करतो आपण.
पण द्वंद्वात अडकलेल्या अशा नात्यांचं आयुष्य अत्यल्प असतं.
ज्या नात्यात आपल्या निर्मळ, निरागस असण्याला कायम धक्केच बसणार असतील, आपली गुदमर ठरलेलीच असेल, तिथं डोक्यावरचं ते ओझं खाली उतरवावं, हलकं व्हावं, आणि मोकळा श्वास घ्यावा.
एकवेळ क्षणभर स्वतःला नाराज केलं तरी चालेल, पण स्वतःवर अन्याय होऊ देऊ नये.
समजपूर्वक थांबावं…..!!