गड किल्ले

तोरणा किल्ल्याबद्दल माहिती ( Brief information of Fort Torna )

         नमस्कार मित्रांनो, अखिल महाराष्ट्र सह संपूर्ण जगाचे स्फूर्तीदाता असणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. मित्रांनो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी महाराष्ट्र भूमीत अनेक गड किल्ले जिंकून घेतले.

 तसेच आपल्या दूरदृष्टीने अनेक नवीन किल्ल्यांची नवनिर्मितीदेखील केली. शिवरायांचा एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे तोरणा किल्ला होय.

मित्रांनो तोरणा हा महाराजांनी आयुष्यात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला होय. असे म्हटले जाते की  राज्यांनी तोरणा जिंकून स्वराज्य रुपी मंगल कार्याचे जणू तोरणच बांधले होते. तोरणा हा एक अतिशय अभेद्य असा गिरीदुर्ग असून पुण्यनगरीच्या वेल्हे तालुक्यामध्ये येतो. आजच्या भागामध्ये आपण तोरणा या गिरिदुर्गाबद्दल अर्थात डोंगरी किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत.

तोरणा किल्ल्याबद्दल प्राथमिक माहिती ( Brief information of fort Torna )

 तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यामधील एक दुर्गम व विशाल किल्ला आहे अशी तोरणा किल्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. तोरणा  किल्ल्याला प्रचंडगड असे देखील म्हटले जाते. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये तोरणा हा किल्ला स्थित असून पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे या किल्ल्यावरून आपल्याला लिंगाणा ,पुरंदर, सिंहगड ,रायगड, हे सर्व गडकोट पहावयास मिळतात.

 तोरणा किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1470 ते 1486 या कालखंडात झाल्याचे पुरावे प्राचीन बखरींमध्ये पहावयास मिळतात. तोरणा किल्ल्याची सर्वसाधारण उंची ही 1403 मीटर म्हणजेच 4603 फूट इतकी आहे.

तोरणा किल्ला बाबत महत्त्वाचा इतिहास (Important history of fort Torna)

तोरणा किल्ल्याचा इतिहास असा की शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम स्वराज्य विस्तार करण्यासाठी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

 शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 मध्ये तोरणा हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला .त्यावेळी शिवाजी महाराज हे केवळ सोळा वर्षांचे होते. ज्यावेळी शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून किल्ल्यावर फेरफटका मारत होते तेव्हा सवंगड्यांसोबत असताना त्यांनी तोरणा किल्ल्याचा प्रचंड असा विस्तार पाहून तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे नवीन नाव दिले .

स्वराज्यामध्ये येणारा हा पहिला किल्ला महाराजांसाठी जणू सोबत धनलक्ष्मी घेऊन आला होता. या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी प्राप्त झाल्या .शिवाजी महाराजांनी या धनलक्ष्मी चा वापर राजगड बांधण्यासाठी केला .इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तोरणा हा किल्ला शिवपंथ यांच्याद्वारे बांधला गेला होता .कारण गडावर असणाऱ्या लेण्यांमध्ये व काही अवशेषांमध्ये तसा उल्लेख आढळतो.

 १४८६ च्या आसपास मलिक अहमद जो बहामनी राजवटीशी संबंधित होता त्याने हा किल्ला जिंकून जिंकून घेतला .

निजामशाहीच्या राज्यामध्ये हा किल्ला अनेक वर्ष निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. महाराजांनी तोरणा किल्ल्याच्या डागडूजीसाठी 5000 होन खर्च केले.

 इतिहासात असे पुरावे आहे की ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल अपेष्टा करून मारले त्यानंतर तोरणा हा किल्ला मुघलांच्या हाती गेला. त्यानंतर स्वराज्याचे शंकराजी नारायण यांनी तोरणा हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला .

पुढे जाऊन औरंगजेबाने तोरणा किल्ल्यास वेडा घालून तोरणा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. औरंगजेब सारख्या या क्रूर बादशहाने स्वराज्यातील सर्वच किल्ले  हे फितुरी करून जिंकलेले होते ,मात्र तोरणा हा एकमेव असा किल्ला होता जो औरंगजेब सारख्या क्रूर मूत्सद्याने लढाई करून जिंकला होता.

 इसवी सन 1708 मध्ये स्वराज्यातील सरनोबत म्हणून ज्यांची ख्याती प्रसिद्ध होती असे नागोजी कोकाटे यांनी तोरणा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. त्यानंतर तोरणा हा कायम स्वराज्याचीच सेवा करत राहिला.

तोरणा किल्ल्यावरील पर्यटक आकर्षक बिंदू  (Places of tourist attraction on fort Torna)

 तोरणा किल्ल्यावर  पर्यटकांना पाहण्यासाठी ऐतिहासिक असा बिनी दरवाजा पहावयास मिळतो. बिनी दरवाजा हा तोरणागडावर जाताना लागणारा पहिला दरवाजा होय. बिनी दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर काही पायऱ्या चढून गेल्यावर समोर येतो तोरणा दरवाजा. त्यानंतर तोरणागडावर मेंगाई देवीचे मंदिर देखील आहे. मेंगाई देवीचे तोरणागडावरील हे मंदिर खूपच प्राचीन मंदिर असल्याचे इतिहासकार सांगतात .

त्यानंतर तोरणा गडावर झुंजार माची हे टोक आहे जेथून आपल्याला स्वराज्यातील अन्य गडकोट जसे की रायगड ,लिंगाणा ,राजगड, सिंहगड ,पुरंदर असे दुर्ग दिसतात. त्याचबरोबर जेव्हा आपण झुंजार माची वरून बुधला माचीकडे प्रस्थान करतो तेव्हा त्याचदरम्यान आपल्याला कोकण दरवाजा पहावयास मिळतो.

 तोरणागडावरील ट्रेक  ( Trek on fort Torna )

जर तुम्ही तोरणागडावर ट्रेक करण्याचे नियोजन करत असाल तर तोरणा किल्ला सर करण्यासाठी साधारणपणे तीन तास इतका अवधी लागतो. चढण्यासाठी हा किल्ला अत्यंत सोपा आहे .तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम तुम्हाला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये वेल्हे गावात जावे लागेल .वेल्हे हे गाव तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.

तोरणा किल्ल्यावर कसे जावे (How to reach Torna fort from Pune )

तोरणा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सर्वप्रथम पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावांमध्ये पोहोचावे लागते पुण्यामधून स्वारगेट बस स्टॅन्ड वरून स्वारगेट वेल्हे घिसर ही बस पकडून तुम्ही वेल्हे या गावात पोहोचू शकता स्वारगेट वरून तुम्हाला दीड ते दोन तासांमध्ये वेल्हे गावात पोहोचता येईल शक्यतो किल्ला सर करण्यासाठी सकाळी चढाई सुरू केली तर उत्तमच

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण तोरणा या गिरीदुर्गाबद्दल जी काही माहिती पाहिली ती आपणास कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

 धन्यवाद!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button