सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा

मराठी भाषा साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे असं आज ठामपणे सांगता येतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किमान सहाशे वर्षे आधीपासून.. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण कसे करावे, त्यासाठी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासाठी महाराजांनी काही नवीन सुचना अथवा प्रघात सुरू केला. यासाठी महाराजांनी बाळाजी आवजी चित्रे या आपल्या चिटणीसांना आणि अशाच काही भाषापंडितांना एकत्र बोलावून एक सुंदर ग्रंथ लिहीण्याची आज्ञा केली. या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले ‘लेखनप्रशस्ती’ !

बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रावर सुलतानांचे आक्रमण झाले. त्याआधी, महाराष्ट्राचा पंतप्रधान होता हेमाद्रीपंडित अथवा ज्याला मराठी लोक अशुद्ध भाषेत म्हणत हेमाडपंत ! वास्तविक पंत हा शब्दही मुसलमानी उच्चारातून बनलेला आहे. मूळ शब्द आहे पंडित. त्या शब्दाचा मुसलमानी उच्चार पंडत. मग त्या पंडताचा पंङ्त, नंतर पंत असा उच्चार होऊ लागला. पूर्वीच्या काळी ब्राह्मण हा हुशार असल्याचा समज असल्याने त्याला पंडित म्हणण्याचा प्रघात होता, आणि पुढे कालानुरूप सगळ्याच ब्राह्मणांना पंत असे म्हटले जाऊ लागले. ते असो, सांगायचे असे, की या हेमाडपंताचे जसे महाराष्ट्रात सुंदर नक्षिकाम केलेली मंदिरे बांधण्यात लक्ष असे, तसेच मराठी भाषेकडेही तितकेच लक्ष असे. व्यक्तिच्या श्रेष्ठत्वानुरूप कोणाला किती महत्त्व द्यायचे आणि ते लिखाणातून कसे दर्शवायचे याबाबत हेमाद्रीपंडिताने काही नियम तत्कालीन व्यवस्थेत घालून दिलेले होते. अर्थात त्यातिल काही नियम पुढे सुलतानी अंमलातही तसेच सुरू राहीले परंतू अल्लाउद्दीन खलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर मात्र अपभ्रंषाचा आणि अशुद्ध, परकीय भाषामिश्रणाचा प्रभाव पडला. आपले कित्येक शब्द भ्रष्ट झाले. दैनंदिन वापरात पूर्वी शुद्ध संस्कृतप्रचूर मराठी भाषेचे जे महत्त्व होते, ते गळून पडू लागले आणि आम्ही फार्सी अथवा उर्दू शब्दांना आपलेसे करू लागलो. क्षमा, पत्नी, दिनांक हे आणि असे अनेक मराठी शब्द जाऊन त्या जागी माफ, बायको, तेरिख असे परकीय शब्द आले ! बाहेरचे शब्द तर बाजूलाच राहीले, परंतू आपली मराठी मंगलमय वाटणारी नावे सुद्धा जाऊन मराठी लोक आपणाला सुलतानजी, पिराजी, शेखोजी, शहाजी, रुस्तुमराव, हैबतराव अशी मुसलमानी नावे स्विकारू लागले.

शिवकाळातही, सुरुवातीच्या काळात, किंबहूना राज्याभिषेकापर्यंत राज्यकारभारात असेच मुसलमानी उच्चारांचे तुर्की अथवा फार्सी शब्द रुढ झाले होते. राज्यकर्त्यांच्या पत्रांमध्ये तेरीख, माहे, मेहेरबान, किताबत इ असे कित्येक शब्द फार्सी होते. पूर्वीच्या, म्हणजे यादवसाम्राज्य बुडाल्यानंतरच्या मराठी सरदारांनी आपल्याच मराठी सरदार मित्राला लिहीलेल्या पत्रांमध्ये मायना कसा होता पहायचं आहे? पहा- “ मशहुरूल अनाम, अजरख्तखाने दामदौलतहू बजाने कारकुनाननी व हाल व इस्तकबाल…. ” आता हा मायना कोणत्या दृष्टीने मराठी भाषेतला वाटतो ? राज्यकारभारातही पेशवा, डबीर, सरलष्कर, फौज,  सुरनवीस, मुजुमदार असे कित्येक वापरातले शब्द परकीय होते. महाराजांनी या शब्दांच्या बद्दल त्यांना प्रतिशब्द म्हणून अस्सल मराठी शब्दांचा कोश तयार करवून घेण्याचा संकल्प पूर्वीच सोडला असणार, परंतू १६४८ च्या पुरंदरच्या लढाईनंतर महाराजांना विश्रांती मिळालीच नाही ! पुढे गागाभट्टांनी महाराजांचे मन वळवून राज्याभिषेकासाठी तयार केले असता, त्याच वेळेस महाराजांनी आपल्या मनातील हे सारे संकल्प पूर्ण करण्याचे ठरवले. महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून आणि धुंडीराज व्यासांकडून राज्यव्यवहार कोश आणि बाळाजी आवजी चित्र्यांकडून लेखनप्रशस्ती लिहून घेतली. 

लेखनप्रशस्ती ही जशीच्या तशी आज उपलब्ध नाही. काळाच्या ओघात ती बहुतांशी नष्ट अथवा गहाळ झाली असावी. परंतू इतर साधनांवरून लेखनप्रशस्ती नेमकी कशी होती हे आपल्याला समजू शकते. या लेखनप्रशस्तीचा नेमका उद्देश तरी काय होता ?-

स्वराज्य निर्माण होऊन, राज्याभिषेकाच्या वेळेस निदान पंचवीस वर्षे तरी नक्कीच पूर्ण झाली होती. परंतू वर उल्लेख केल्याप्रमाणेच पत्रांचे मायने मात्र यवनीच होते. स्वराज्यातले मराठी लोक परस्परांस वा राजास लिहीतानाही मनाला येईल त्याप्रकारे मायना लिहीतात, हे महाराजांना पटत नव्हते. यामूळे एकप्रकारची हवी तशी शिस्त राज्यकारभारात राहत नाही. कोणाच्याही नकळत एक प्रकारचा ढिसाळपणा निर्माण होतो. आता स्वराज्यात मुसलमानी मायने घेणे अशक्य आहे. हे राज्य हिंदूंचं असल्याने येथील राज्यकारभार असेल वा खाजगी-सामाजिक व्यवहार, इथे मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झाले पाहीजे ! त्यामूळे, मुसलमानी अंमलाच्या पूर्वीचा लेखनाच ा शिरस्ता काय होता त्यानुसार पुन्हा मराठी मराठी भाषेचे पुनरुज्जिवन करण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. यासाठी महाराजांनी आधार म्हणून यादवकालिन हेमाद्री पंडितांनी घालून दिलेले नियम वापरण्याचा निर्णय घेतला.

एकूणच, महाराजांनी महाराष्ट्राच्या लेखनपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. लेखनप्रशस्ती आणि राज्यव्यवहारकोश हा त्याचाच एक भाग होय ! प्रथम भषेचे शुद्धीकरण झाले पाहीजे हा महाराजांचा आग्रह होता. एखाद्या गोष्टीच्या संज्ञा बदलल्या की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असणार्‍या संवेदनाही बदलतात, त्या गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. आणि म्हणूनच, ज्ञानेश्वर महाराजांनी “ माझ्या मराठीचे बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरें रसिकें मेळविन ॥ ” असं म्हटल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच मराठीचे कोडकौतुक करून तीला पुनश्च राजभाषेचे स्थान बहाल करण्याचे महान कार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button